प्रतिबंधित सुगंधित तंबाखूविरोधात भंडारा पोलिसांची धडक कारवाई : दोन ठिकाणी छापे, आरोपी ताब्यात

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : जिल्ह्यात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूच्या अवैध तस्करीला आळा घालण्यासाठी भंडारा जिल्हा पोलिस व अन्न व औषध प्रशासनाने संयुक्तपणे धडक कारवाई करत दोन वेगवेगळ्या ठिकाणी मोठा साठा जप्त केला. भंडारा शहर आणि तुमसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आलेल्या या कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडील प्रतिबंधित सुगंधित तंबाखू, पानमसाला आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
पहिली कारवाई भंडारा शहरातील नूतन कन्या शाळेजवळील बजरंग चौक परिसरात करण्यात आली. या कारवाईत संजय सुरेशलाल शादीजा ३८ वर्षे रा. सिंधी कॉलनी, भंडारा हा दुचाकीवरून काळ्या रंगाच्या पिशवीत प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व पानमसाल्याची अवैधरित्या वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला रंगेहात पकडले. तपासणीदरम्यान त्याच्याकडून प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा आढळून आला.
दुसरी कारवाई तुमसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. येथे पथकाने भाऊलाल उर्फ छोटू श्रावण बिसने याला दुचाकीवरून दोन पोत्यांमध्ये प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची वाहतूक करताना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडून सुगंधित तंबाखूचा साठा, दुचाकी आणि इतर साहित्य असा एकूण १ लाख १७ हजार ७५६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
भंडारा जिल्हा पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या संयुक्त कारवाईमुळे जिल्ह्यात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध व्यापाराला मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संबंधित दोन्ही आरोपींविरुद्ध प्रचलित कायद्यांनुसार गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, जिल्ह्यात अशा प्रकारच्या अवैध व्यवसायाविरोधात भविष्यातही सातत्याने कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
News - Bhandara




Petrol Price




