महत्वाच्या बातम्या

 विरूर स्टेशनमध्ये युवकांचे स्वच्छता अभियान : ग्रामपंचायतीकडून सहकार्याचे आश्वासन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / विरूर स्टेशन (राजुरा) : विरूर स्टेशन येथील जागरूक व सुशिक्षित युवकांनी गाव स्वच्छतेसाठी पुढाकार घेत श्रमदानातून स्वच्छता अभियान राबविल्याने गावात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. स्वतः झाडू हातात घेऊन सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करणाऱ्या युवकांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, लोकसहभागातून गाव स्वच्छ ठेवण्याचा संदेश या मोहिमेतून देण्यात आला.

गावातील युवकांनी राबविलेल्या या स्वच्छता मोहिमेमुळे ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीवरही चर्चा सुरू झाली आहे. गावातील काही नागरिकांनी स्वच्छतेच्या प्रश्नावर ग्रामपंचायतीने अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली असून, युवकांना स्वतः मैदानात उतरावे लागत असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाच्या कामकाजाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

युवा शक्तीच्या या उपक्रमात विशाल देरकर, नानी राठोड, प्रेम श्रीकोंडावार, संस्कार निमलवार, शुभम भोस्कर, रोहन सोनी, श्रावण रेड्डी, करण कहार, अस्मित बोडेकर, स्नेहल मोरे, प्रतीक मोरे, साहिल अलोने, चेतन वरवाडे, अनिकेत चोचले, जीव तोडे, संजू वर्मा, आदित्य वर्मा, विकी सोनी, शीतिज तुराणकर, प्रवीण नांदेकर, पवन सोनी यांच्यासह अनेक युवकांनी श्रमदान केले. त्यांच्या या सामाजिक योगदानाबद्दल ग्रामपंचायत प्रशासनाने त्यांचा जाहीर सत्कार करून अभिनंदन केले.

याबाबत ग्रामपंचायत अधिकारी कातकर यांनी सांगितले की, ग्रामपंचायत गावाच्या स्वच्छतेसाठी कटिबद्ध असून दैनंदिन कचरा संकलन व साफसफाईची व्यवस्था सुरू आहे. मात्र वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक ठिकाणी वाढणारा कचरा लक्षात घेता नवीन कचराकुंड्या उभारणे, कचरा संकलन केंद्र सुरू करणे तसेच घंटागाडीच्या नियमित फेऱ्यांचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे. नागरिक व युवकांच्या मागणीनुसार लवकरच विशेष स्वच्छता मोहीमही राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ग्रामसेवकांनीही गावाच्या सर्वांगीण स्वच्छतेसाठी ग्रामपंचायत आवश्यक ती पावले उचलेल, असे सांगत नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता कचरा संकलन व्यवस्थेला सहकार्य करण्याचे आवाहन केले. ग्रामपंचायत ही संपूर्ण गावाची संस्था असून लोकसहभागाशिवाय स्वच्छ गावाची संकल्पना पूर्ण होऊ शकत नाही, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, युवकांनी दाखविलेल्या सामाजिक बांधिलकीमुळे विरूर स्टेशनला स्वच्छ व आदर्श गाव बनविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. युवकांचा उत्साह आणि ग्रामपंचायतीचे नियोजन यांची सांगड घातल्यास गावातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos