बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी : बछड्यांसह मादीचा परिसरात वावर, ग्रामस्थांमध्ये दहशत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : तालुक्यातील बीबीटोला येथील शेतशिवारात सोमवारी ३ ऑगस्ट दुपारी सुमारे १ वाजता मादी बिबट्याने शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यावर हल्ला करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे बीबीटोला, नहरटोला आणि सोनेगाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. जखमी शेतकऱ्यावर गोंदिया येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी बीबीटोला परिसरात बिबट्याची दोन बछडी आढळून आली होती. अनभिज्ञतेमुळे काही ग्रामस्थांनी ती घरी आणली होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाने दोन्ही बछड्यांना ताब्यात घेऊन पुन्हा जंगलात सुरक्षितपणे सोडले होते. त्यानंतर संबंधित मादी बिबट्या आपल्या बछड्यांसह परिसरात वारंवार वावरत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
सोमवारी दुपारी शेतकरी पृथ्वीराज अंबुले हे आपल्या शेतात काम करीत असताना अचानक मादी बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली. या हल्ल्यात त्यांच्या चेहऱ्यावर व खांद्यावर गंभीर जखमा झाल्या. त्यांच्या आरडाओरडीनंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जखमी शेतकऱ्याला तातडीने उपचारासाठी गोंदिया येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी परिसराची पाहणी करून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला आहे. तसेच परिसरात गस्त वाढविण्यात आली असून, नागरिकांना शेतात किंवा जंगलालगतच्या भागात एकटे न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
वन विभागाच्या माहितीनुसार, मादी बिबट्या आणि तिचे दोन्ही बछडे अजूनही बीबीटोला, नहरटोला आणि सोनेगाव परिसरात वावरत आहेत. वृत्त लिहीपर्यंत मादी बिबट्या एका झाडावर बसून असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे वन विभागाकडून तिच्यावर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून, सुरक्षितपणे पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
या घटनेनंतर परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषत शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी, एकट्याने शेतात जाऊ नये तसेच बिबट्याचा वावर आढळल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन वन विभागाने केले आहे.
News - Gondia




Petrol Price




