महत्वाच्या बातम्या

 लोकप्रतिनिधींना राज्याच्या प्रश्नांची जाण असणे आवश्यक : मंत्री चंद्रकांत पाटील


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : संसद, विधिमंडळात काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींना मतदार संघातील प्रश्नांबरोबरच राज्याच्या प्रश्नांची जाण असणे आवश्यक आहे. जनहित तसेच विकासाची कामे करताना लोकप्रतिनिधींना कायदे, नियम याची इत्यंभूत माहिती असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले.

लोकप्रतिनिधींची स्वतःच्या मतदार संघाविषयी कर्तव्ये आणि विकास कामांचे नियोजन या विषयावर राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या ५० व्या संसदीय अभ्यास वर्गात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पाटील बोलत होते. यावेळी विधानमंडळ सचिव जितेंद्र भोळे उपस्थित होते.

संसद, विधिमंडळामध्ये काम करणारा लोकप्रतिनिधी हा लोकांच्या वतीने काम करणारा प्रतिनिधी असतो. त्यांना लोकांसाठी काम करण्याची संधी मिळाली असल्याने निवडणुकीनंतर लोकांचा नेता म्हणून पक्ष विरहित काम केले पाहिजे. लोकांच्या मनावर राज्य करणे हे चांगल्या लोकप्रतिनिधींचे लक्षण आहे. जनसामन्यात चुकीचा  संदेश, जावू नये यासाठी सदैव दक्ष राहिले पाहिजे. यासाठी मतदार संघात उत्तम काम करणारी त्याची टीम असणेही आवश्यक असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.

मतदार संघातील लोकांच्या गरजा ओळखून व जाणून घेऊन लोकप्रतिनिधींना विकास कामांचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे सांगून संसदीय कार्य मंत्री पाटील म्हणाले, विकास कामांसाठी मिळणाऱ्या शासनाच्या निधीच्या खर्चाचे योग्य नियोजन त्यांनी करावे. मतदार संघातील विकास कामांचा प्राधान्यक्रम ठरवून त्या पद्धतीने त्या कामांवर निधी खर्च करावा.

जागरुक मतदार हा लोकशाहीचा कणा असून अलीकडील काळात मतदानाचे प्रमाण वाढत असले तरी आजही ३० ते ३५ टक्के लोक मतदान करत नाहीत. हे लोकशाहीसाठी  चांगले लक्षण नव्हे. उदासीन मतदारामुळे लोकांना योग्य प्रतिनिधी मिळत नाही. लोकांनी अधिकाधिक मतदान केले तर लोकांना हवा असलेला प्रतिनिधी त्यांना निवडता येण्याची संधी असते. यामुळे जगात सर्वात मोठी असलेली आपली लोकशाही अधिकाधिक सक्षम बनत जाईल, अधिकाधिक मतदान व्हावे यासाठी  विद्यार्थ्यांनी आपापल्या विद्यापीठात, महाविद्यालयामध्ये मतदान राजदूत म्हणून काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. चांगले राज्यकर्ते तयार होण्यासाठीही युवकांनी राजकारणात व चळवळीत सक्रिय होणे आवश्यक असल्याचे सांगून संसदीय कार्य मंत्री पाटील म्हणाले,राज्यशास्त्र आणि लोकप्रशासनहा विषय विकासासाठी फार महत्त्वाचा आहे. लोकशाहीमध्ये सगळे निर्णय राज्यकर्तेच घेत असतात. सुदृढ, सक्षम लोकशाहीसाठी अधिकाधिक मतदान होणे आवश्यक असल्याचेही पाटील म्हणाले.

लोकप्रतिनिधी बाबतची संकल्पना समजावून सांगताना पाटील म्हणाले, लोकप्रतिनिधी म्हणजे असा व्यक्ती जो लोकहिताचे प्रतिनिधित्व करतो आणि विधिमंडळाचा सदस्य असतो. संसदीय लोकशाही व्यवस्थेत लोकप्रतिनिधी, मतदार, मतदारसंघ, निवडणुका आणि विकास यांचा परस्पर अविभाज्य संबंध असतो. प्रतिनिधित्व ही संकल्पना आपल्या लोकशाही विषयक विचारांमध्ये आणि व्यवहारांमध्ये मध्यवर्ती असते. किंबहुना अनेक वेळा लोकशाहीचा उल्लेख प्रातिनिधिक लोकशाही असाच केला जातो. म्हणजे लोकांनी प्रतिनिधी निवडून द्यायचे आणि त्या प्रतिनिधींमार्फत सार्वजनिक निर्णय घ्यायचे अशी ही व्यवस्था असते, असेही ते म्हणाले.

प्रारंभी विधिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांनी संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांचा परिचय करून दिला. तर शेवटी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील असिया जमादार या विद्यार्थिनीने आभार मानले.





  Print






News - Nagpur




Related Photos