महत्वाच्या बातम्या

 पप्पू देशमुख यांचा इरई खोलीकरणातील गैरव्यवहाराचा आरोप : माती चोरी व अवैध विक्री प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी


- ऑनस्पॉट पंचनाम्यात अनेक कथित गैरप्रकार उघड; आकडेवारीतील तफावतही समोर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : इरई नदी खोलीकरण टप्पा-२च्या कामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप स्थायी समितीच्या खोलीकरण उपसमितीचे सदस्य तथा नगरसेवक प्रदीप उर्फ पप्पू देशमुख यांनी केला आहे. खोलीकरणातून काढण्यात आलेल्या मातीची अवैध विक्री करण्यात आली असून कामाच्या आकडेवारीतही मोठी तफावत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या संदर्भात महापौर, स्थायी समिती सभापती आणि मनपा आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

देशमुख यांनी मनपाचे अभियंता आशिष भारती तसेच इरई बचाव जनआंदोलनाचे कुशाबराव कायरकर यांच्यासमवेत सलग तीन दिवस इरई नदी खोलीकरणाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी कंत्राटदार आणि मनपा अधिकाऱ्यांनी खोलीकरणातून निघालेली माती सात वेगवेगळ्या ठिकाणी साठवून ठेवण्यात आल्याचे सांगितले. मात्र, पाहणीदरम्यान रूईबन हनुमान मंदिराजवळ साठवून ठेवण्यात आलेला मातीचा ढिगारा पूर्णपणे गायब झाल्याचे आढळून आले.

याबाबत विचारणा केल्यानंतर संबंधित माती चोरीला गेल्याचे स्पष्टीकरण कंत्राटदार व मनपा अधिकाऱ्यांनी दिल्याचा दावा देशमुख यांनी केला. तसेच उर्वरित काही ठिकाणीही केवळ लहान स्वरूपाचे मातीचे ढिगारे दिसून आल्याने मोठ्या प्रमाणात मातीची अवैध विक्री झाल्याचा संशय अधिक बळावल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पाहणीदरम्यान आढळून आलेल्या कथित गैरप्रकारांची सविस्तर माहिती सोमवारी ८ जू) प्रशासनाला सादर करण्यात आली. यावेळी जनविकास सेनेच्या नगरसेविका मनीषा बोबडे आणि प्रतीक्षा येरगुडे उपस्थित होत्या.

क्यूआर कोडद्वारे माती विक्रीचा आरोप -
खोलीकरणातून निघालेल्या रेतीमिश्रित मातीची विक्री थेट खाजगी ग्राहकांना करण्यात आल्याचा आरोपही देशमुख यांनी केला आहे. यासाठी संबंधित कंत्राटदाराकडून क्यूआर कोडच्या माध्यमातून ऑनलाईन पेमेंट स्वीकारण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महसूल विभागाची आवश्यक परवानगी न घेता ही विक्री करण्यात आल्याचा दावा करत त्यांनी संबंधित क्यूआर कोड प्रशासनाकडे पुरावा म्हणून सादर केला आहे.

यामुळे कंत्राटदाराने एकाच कामासाठी महापालिका आणि खाजगी ग्राहक अशा दोन्ही स्तरांवर आर्थिक लाभ मिळविल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

गाळ उपशाच्या आकडेवारीत मोठी तफावत -
इरई नदी खोलीकरणाच्या कामातील गाळ उपशाच्या आकडेवारीतही गंभीर विसंगती असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पाटबंधारे विभागाच्या पत्रानुसार एप्रिल २०२६ अखेरपर्यंत ४२.७२४ टीसीएम गाळ काढण्यात आल्याची नोंद आहे. मात्र, महापालिकेच्या नोंदीत तब्बल १२१.११२ टीसीएम गाळ उपसा झाल्याचे दाखविण्यात आले आहे.

या दोन आकडेवारीतील मोठ्या फरकामुळे संपूर्ण कामाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच काढण्यात आलेली माती नदीपात्रातच टाकण्यात आल्याने ती अंतिम मोजमापातून वगळावी, असे पाटबंधारे विभागाच्या पत्रात स्पष्ट नमूद असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

फोटो व व्हिडिओ पुरावे प्रशासनाकडे -
झरपट-इरई संगम परिसरातून ट्रॅक्टर आणि हायवा वाहनांच्या माध्यमातून खाजगी व्यक्तींना माती पुरवली जात असल्याचे फोटो आणि व्हिडिओ पुरावेही प्रशासनाकडे सादर करण्यात आले आहेत. या पुराव्यांच्या आधारे संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जनविकास सेनेतर्फे करण्यात आली आहे.

दरम्यान, या आरोपांबाबत महापालिका प्रशासन किंवा संबंधित कंत्राटदार यांची अधिकृत प्रतिक्रिया वृत्त लिहिपर्यंत प्राप्त झाली नव्हती.





  Print






News - Chandrapur




Related Photos