रक्ताच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी जीएमसीत रक्तदान सप्ताह : अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी व जवानांचा उत्स्फूर्त सहभाग

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यात निर्माण झालेल्या रक्ताच्या वाढत्या तुटवड्यावर मात करण्यासाठी स्थानिक कर्मवीर सा. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (जीएमसी) येथे रक्तदान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्जरी विभाग, पदव्युत्तर विद्यार्थ्यांची मार्ड संघटना आणि सर्जन्स असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ११ जून रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून या उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला.
शासकीय रक्तकेंद्राच्या आकडेवारीनुसार, सन २०२५ मध्ये एकूण १५ हजार २५८ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले होते. मात्र चालू वर्षात आतापर्यंत केवळ ५ हजार १०२ रक्तपिशव्यांचे संकलन झाल्याने रक्ताचा गंभीर तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी अनेक गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध करून देताना अडचणी येत आहेत. ही परिस्थिती लक्षात घेऊन रक्तसंकलन वाढविण्यासाठी जीएमसी प्रशासनाने विशेष पुढाकार घेत रक्तदान सप्ताहाचे आयोजन केले आहे.
राष्ट्रीय सर्जन सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन जीएमसीचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सर्जन्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सचिन सरदेशपांडे, महाराष्ट्र सर्जन असोसिएशनचे कोषाध्यक्ष डॉ. संजय घाटे, सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. मयुर बंडावर तसेच ज्येष्ठ सर्जन डॉ. मंगेश टिपणीस यांची प्रमुख उपस्थिती होती.
रक्तदान सप्ताहांतर्गत विविध घटकांचा सहभाग सुनिश्चित करण्यात आला आहे. १२ जून रोजी महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी रक्तदान केले, तर १३ जून रोजी पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. याशिवाय १५ जून रोजी महाविद्यालयातील अधिकारी व कर्मचारी रक्तदान करणार आहेत. त्यामुळे रक्तसंकलनात लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या उपक्रमाचे नियोजन रक्तकेंद्र प्रमुख डॉ. अमित प्रेमचंद, रक्त संक्रमण अधिकारी डॉ. स्वाती देरकर, डॉ. मिलिंद झाडे, राकेश शेंडे तसेच मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. मयुर सदवाणी आणि सचिव डॉ. शोएब शेख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे.
यावेळी अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना, दानशूर नागरिक आणि युवकांना पुढाकार घेऊन रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचे आवाहन केले. तसेच नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान करून शासकीय रक्तकेंद्रातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले.
शासकीय रक्तकेंद्रात उपलब्ध होणाऱ्या रक्तपिशव्या गरजू रुग्णांना विनामूल्य दिल्या जात असल्याचे नमूद करत, रक्तदान हे केवळ सामाजिक कर्तव्य नसून अनेकांचे प्राण वाचविणारे जीवनदायी कार्य असल्याचे डॉ. कांबळे यांनी स्पष्ट केले. समाजहितासाठी अधिकाधिक नागरिकांनी रक्तदान चळवळीत सहभागी होण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
News - Chandrapur




Petrol Price




