महत्वाच्या बातम्या

 गावकऱ्यांच्या हक्कासाठी उभ्या राहिलेल्या तंटामुक्ती सदस्याला धमकी : विरूरमध्ये संतापजनक प्रकार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशन येथे ग्रामपंचायत कार्यालयात व्यक्तिगत कामासाठी गेलेल्या तंटामुक्ती सदस्याला ग्रामपंचायत सदस्याने अश्लील व अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मारहाणीची तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, संबंधिताविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तंटामुक्ती सदस्य जगतसिंग गुरमीतसिंग वधावन यांनी यासंदर्भात विरूर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. तक्रारीनुसार, १८ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे १२ वाजता वधावन हे व्यक्तिगत कामासाठी अर्ज सादरण्यास ग्रामपंचायत कार्यालयात गेले होते. ग्रामसेवकांशी अर्जाबाबत चर्चा सुरू असताना ग्रामपंचायत सदस्य प्रदीप पाला तेथे आले.

त्यानंतर पाला यांनी जुन्या वादाचा राग मनात धरून आपल्याला अत्यंत अश्लील व अपमानास्पद भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. वधावन यांनी शांतपणे आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला असतानाही शिवीगाळ सुरूच राहिली. तसेच कार्यालयाबाहेर येण्यास सांगून मारहाणीची धमकी देण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

पोलीस ठाण्यात तक्रार केल्यास आपल्याविरुद्ध खोटा ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोपही वधावन यांनी केला आहे. त्यामुळे त्यांनी पुन्हा ग्रामपंचायत कार्यालयातच थांबणे पसंत केले. मात्र संबंधित व्यक्ती वारंवार कार्यालयात ये-जा करून शिवीगाळ करीत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यापुढे ग्रामपंचायत कार्यालयाबाहेरूनही आपल्याला उद्देशून धमकी देण्यात आली. ग्रामपंचायतमध्ये पुन्हा आल्यास मारून टाकण्याची धमकी दिल्याने आपल्या जीवितास धोका निर्माण झाल्याची भीती वधावन यांनी व्यक्त केली आहे.

विशेष म्हणजे, हा संपूर्ण प्रकार ग्रामपंचायत कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे घटनेच्या वेळीचे सीसीटीव्ही फुटेज तातडीने सुरक्षित करून ताब्यात घ्यावे आणि त्याची पाहणी करावी, अशी मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे. ग्रामपंचायत ही गावकऱ्यांची स्थानिक स्वराज्य संस्था असून, आपल्या कामासाठी कार्यालयात गेलेल्या नागरिकाला धमकावणे व अपमानित करणे हा गंभीर प्रकार असल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराबाबत यापूर्वी ग्रामसभेत प्रश्न उपस्थित केल्याचा राग मनात धरून हा प्रकार घडल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून लागू कायदेशीर कलमांनुसार कारवाई करावी, तसेच भविष्यात आपल्या जीवितास किंवा सुरक्षिततेस धोका निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशी मागणी तंटामुक्ती सदस्य जगतसिंग गुरमीतसिंग वधावन यांनी विरूर पोलिसांकडे केली आहे.





  Print






Related Photos