विजेच्या धक्क्याने विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : आपले कपडे धुऊन वाळवत असताना एका विद्यार्थ्याला विजेच्या धक्का बसल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी सकाळी बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे घडली. आयुष विशाल लाडे (वय १६) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.
आज रविवारी सकाळी सुमारे ८.३० वाजताच्या सुमारास आयुष आंघोळ करून घराबाहेर कपडे वाळत घालण्यासाठी गेला असता अचानक त्याला विजेचा जबर धक्का बसला. या घटनेत तो गंभीर जखमी होऊन जागीच कोसळला. आरडाओरड ऐकून परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत त्याला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आयुष शिक्षण घेत होता. लहानपणीच वडिलांचे निधन झाल्यानंतर तो आजोबांकडे राहून आपले शिक्षण पूर्ण करीत होता. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने सुट्टीच्या काळात काम करून तो आजोबांना हातभार लावत होता. नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या परीक्षेत त्याने ५६.४० टक्के गुण मिळवून यश संपादन केले होते. शिक्षणाच्या जोरावर आयुष्य बदलण्याचे स्वप्न तो पाहत होता. मात्र नियतीने त्याच्यावर काळाचा घाला घातला.
हुशार, शांत आणि कष्टाळू स्वभावामुळे आयुष गावात सर्वांच्या परिचयाचा होता. दहावीच्या निकालानंतर कुटुंबात आनंदाचे वातावरण असतानाच घडलेल्या या दुर्दैवी घटनेने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. एका होतकरू विद्यार्थ्याचा असा अचानक अंत झाल्याने विसापूर गावात हळहळ व्यक्त केली जात असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
News - Chandrapur




Petrol Price




