१५ लाख ३० हजारांची धाडसी चोरी उघड : तेलंगणातून आरोपी जेरबंद, संपूर्ण मुद्देमाल हस्तगत

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : गोंडपिपरी तालुक्यातील सोनापूर (दे.) येथे एका किराणा व्यावसायिकाच्या दुकानाचे कुलूप तोडून तब्बल १५ लाख ३० हजार रुपयांची रोकड चोरून नेणाऱ्या आरोपीला लाठी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत तेलंगणातून अटक करून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.
सोनापूर येथील व्यावसायिक समीर अरुण बोमकंटीवार यांच्या मालकीचे कृषी केंद्र व किराणा दुकान आहे. १२ जून रोजी दुपारी ते पत्नीसमवेत बँकेच्या कामानिमित्त गोंडपिपरी येथे गेले होते. दुकानातील टेबलच्या ड्रॉवरमध्ये ३० हजार रुपये रोख रक्कम तर घरात एका कापडी पिशवीत १५ लाख रुपये ठेवून त्यांनी घर व दुकान कुलूपबंद केले होते. बँकेच्या कामास विलंब झाल्याने ते रात्री गोंडपिपरी येथेच थांबले.
१३ जून रोजी पहाटे घरी परतत असताना गावातील एका नागरिकाने फोन करून दुकानाचे दार तुटले असल्याची माहिती दिली. त्यानंतर समीर बोमकंटीवार यांनी तत्काळ घरी धाव घेतली व लाठी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता दुकानाचे कुलूप तोडण्यात आल्याचे दिसून आले. तपासादरम्यान दुकानातील व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले.
सीसीटीव्हीमध्ये गावातीलच आशिष जानकीराम चौधरी हा तोंडाला रुमाल बांधून दुकानात प्रवेश करताना स्पष्टपणे दिसून आला. त्याने दुकानातील ड्रॉवरमधील ३० हजार रुपये रोख रक्कम घेतल्याचे तसेच १५ लाख रुपये असलेली कापडी बॅग घेऊन दुचाकीवरून पसार झाल्याचे फुटेजमध्ये आढळून आले. यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रभारी ठाणेदार हेमंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दोन विशेष पथके तयार करण्यात आली. एक पथक तेलंगणात तर दुसरे पथक गडचिरोली परिसरात रवाना करण्यात आले. तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन व गुप्त माहितीच्या आधारे आरोपी आशिष चौधरी हा तेलंगणातील कागजनगरजवळील अयनी येथे नातेवाईकांच्या घरी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार लाठी पोलिसांचे पथक तातडीने तेलंगणात रवाना झाले. या मोहिमेत चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही सहभागी झाले. संयुक्त कारवाईदरम्यान आरोपीला तेलंगणा राज्यातील अयनी येथून ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून चोरीस गेलेली संपूर्ण १५ लाख ३० हजार रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे.
सदर कारवाई लाठीचे प्रभारी ठाणेदार हेमंत पवार, पो हवा अशोक मंजुळकर, म पो हवा सौजण्या जंजिरलावार, पोअं चेतन झाडे, तनुज टेकाम, संदीप नन्नावरे, श्रवण कुत्तरमारे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यांनी केले.
News - Chandrapur




Petrol Price




