तहसील कार्यालय परिसरात अंधार अन् वाढलेली झाडाझुडपे : वन्यप्राण्यांच्या वावराने कर्मचाऱ्यांमध्ये भीती


- पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी सुरक्षिततेचा प्रश्न; झाडाझुडपे तातडीने हटविण्याची मागणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : सिंदेवाही तहसील कार्यालयाच्या आवारातील भूमी अभिलेख कार्यालय परिसर तसेच नव्याने बांधण्यात आलेल्या तहसील कार्यालयाच्या इमारतीभोवती मोठ्या प्रमाणावर झाडे-झुडपे आणि गवत वाढल्याने परिसराची अवस्था जंगलासारखी झाली आहे. त्यातच कार्यालय परिसरातील पथदिवे बंद असल्यामुळे रात्रीच्या वेळी संपूर्ण परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरत आहे.
वाढलेली झाडाझुडपे आणि अंधार यामुळे वन्यप्राणी तसेच साप, विंचू यांसारख्या विषारी जीवांचा धोका वाढला असून अधिकारी, कर्मचारी आणि कार्यालयीन कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सिंदेवाही तहसील कार्यालयाच्या आवारात भूमी अभिलेख कार्यालय कार्यरत आहे. तसेच कोट्यवधी रुपये खर्च करून तहसील कार्यालयाची सुसज्ज नवीन इमारत उभारण्यात आली आहे. मात्र, या इमारतीच्या सभोवताली आणि भूमी अभिलेख कार्यालय परिसरात नियमित स्वच्छता व झाडाझुडपांची साफसफाई होत नसल्याने मोठ्या प्रमाणावर गवत आणि झुडपे वाढली आहेत. त्यामुळे परिसरात वन्यजीवांना लपण्यासाठी सुरक्षित जागा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे, भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी शासकीय कामानिमित्त अनेकदा रात्री उशिरापर्यंत कार्यालयात थांबतात. तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारीदेखील विविध शासकीय कामे आणि नागरिकांशी संबंधित प्रकरणे पूर्ण करण्यासाठी कार्यालयीन वेळेनंतरही काम करीत असतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी कार्यालयातून बाहेर पडताना या कर्मचाऱ्यांना वाढलेल्या झाडाझुडपांमधून तसेच अंधारातून मार्ग काढावा लागतो.
महिला अधिकाऱ्याला रात्री दिसला वन्यप्राणी -
दरम्यान, सुमारे १५ ते २० दिवसांपूर्वी भूमी अभिलेख कार्यालयातील एका महिला अधिकाऱ्याला रात्रीच्या सुमारास कार्यालयाच्या परिसरात एक वन्यप्राणी फिरताना प्रत्यक्ष दिसून आल्याची माहिती आहे. या प्रकारामुळे कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. संबंधित अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती तत्काळ तहसीलदारांना दिल्याचे सांगण्यात येते.
गंभीर घटना निदर्शनास आणून दिल्यानंतरही परिसरातील वाढलेली झाडाझुडपे हटविणे किंवा सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याबाबत अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याची नाराजी अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे भविष्यात एखादी अप्रिय घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोणाची, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
पथदिवे बंद असल्याने रात्री काळोख -
तहसील कार्यालयाच्या आवारातील आणखी एक गंभीर समस्या म्हणजे कार्यालयाबाहेरील पथदिव्यांची व्यवस्था बंद असणे. रात्रीच्या वेळी या परिसरात पुरेसा प्रकाश नसल्यामुळे संपूर्ण आवारात अंधार पसरतो. वाढलेली झाडे-झुडपे आणि त्यातच अंधार असल्याने वन्यप्राणी अथवा विषारी जीव आल्यास ते सहजपणे दिसून येणे कठीण आहे.
कार्यालयातून रात्री बाहेर पडणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे. विशेषतः महिला अधिकारी व कर्मचारी तसेच रात्रीच्या वेळी कार्यालयीन कामासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
तातडीने स्वच्छता व प्रकाशव्यवस्था सुरू करण्याची मागणी -
तहसील कार्यालयासारख्या महत्त्वाच्या शासकीय कार्यालयाच्या परिसरात अशा प्रकारची अस्वच्छता आणि अंधार राहणे ही बाब प्रशासनाच्या दृष्टीने चिंताजनक आहे. त्यामुळे परिसरातील वाढलेली झाडे-झुडपे व गवत तातडीने कापून संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्यात यावी, तसेच बंद असलेली पथदिव्यांची व्यवस्था तातडीने दुरुस्त करून रात्रीच्या वेळी पुरेसा प्रकाश उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांकडून होत आहे.
वन्यप्राण्यांचा संभाव्य धोका लक्षात घेऊन संबंधित वनविभागाला माहिती देऊन आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी होत आहे. प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कार्यवाही न केल्यास भविष्यात एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता संबंधित प्रशासकीय अधिकारी या गंभीर प्रश्नावर काय भूमिका घेतात आणि प्रत्यक्षात कधी उपाययोजना करतात, याकडे सिंदेवाहीकरांचे लक्ष लागले आहे.




Petrol Price




