एलसीबीची वाठोड्यात मोठी कारवाई : एक लाखांची देशी दारू जप्त, दोघे ताब्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाने अवैध दारूविक्रीविरोधात कारवाई करत वरोरा तालुक्यातील वाठोडा येथे एका घरातून एक लाख रुपये किमतीची देशी दारू जप्त केली. या कारवाईत रॉकेट संत्रा देशी दारूच्या ९० मिली क्षमतेच्या २ हजार ५०० सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, आणखी एका आरोपीचा शोध सुरू आहे.
शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस स्टेशन शेगाव हद्दीत पेट्रोलिंग सुरू असताना मौजा वाठोडा येथे ही कारवाई केली. आरोपीच्या घराची झडती घेतली असता २५ खोक्यांमध्ये भरून ठेवलेल्या रॉकेट संत्रा देशी दारूच्या एकूण २ हजार ५०० सीलबंद बाटल्या आढळून आल्या. जप्त करण्यात आलेल्या दारूची किंमत अंदाजे एक लाख रुपये आहे.
या प्रकरणी निखिल शेखर जोंगोनी (वय २३), रा. खांबाडा, ता. वरोरा आणि प्रवीण मारोतराव सुरसे (वय ३२), रा. बारवा, ता. वरोरा यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन शेगाव येथे अपराध क्रमांक ३१५/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई) व ८३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच प्रशांत ऊर्फ परशु आत्राम (रा. वाठोडा, ता. वरोरा) हा पाहिजे आरोपी असून, त्याचा शोध घेतला जात आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वाखाली वरोरा-चिमूर उपविभागाच्या पथकाने केली. अवैध दारूच्या साठवणुकीविरोधात करण्यात आलेल्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू व्यवसायावर पोलिसांनी लक्ष केंद्रित केल्याचे स्पष्ट झाले आहे.




Petrol Price




