पीएम विश्वकर्मा योजनेबाबत जनजागृती


- गडचिरोलीत जनजागृती मेळावा; पारंपरिक कारागीर व व्यावसायिकांना योजनेच्या लाभाची माहिती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : केंद्र शासनाच्या पीएम विश्वकर्मा योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी व्हावी तसेच पारंपरिक कारागीर आणि व्यावसायिकांना योजनेची सविस्तर माहिती मिळून त्यांना विविध सुविधांचा लाभ घेता यावा, या उद्देशाने गडचिरोली शहरातील कॉम्प्लेक्स परिसरात ९ सप्टेंबर रोजी जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
पारंपरिक व्यवसाय व हस्तकला क्षेत्राशी संबंधित कारागिरांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या कौशल्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे तसेच त्यांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनाच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्यापैकी पीएम विश्वकर्मा योजना पारंपरिक कारागिरांसाठी महत्त्वपूर्ण ठरत असून, या योजनेची माहिती तळागाळातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने या मेळाव्यात मार्गदर्शन करण्यात आले.
विविध विभागांचे अधिकारी उपस्थित -
या जनजागृती मेळाव्यास एमएसएमई नागपूरचे सहायक संचालक व्ही. व्ही. शिरसाठ, सहायक संचालक बघेल, बँक ऑफ इंडियाचे जिल्हा अग्रणी प्रबंधक प्रशांत धोंगळे, आरसेटीचे दादाजी आष्टीकर, जन शिक्षण संस्थेचे विनोद आखरे आणि जिल्हा उद्योग केंद्राच्या उद्योग निरीक्षक पूनम कुसराम यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी भास्कर मेश्राम यांनी केले. यावेळी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी पीएम विश्वकर्मा योजनेची अंमलबजावणी, पात्र लाभार्थी तसेच पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या कारागिरांसाठी उपलब्ध असलेल्या विविध संधींबाबत उपस्थितांना माहिती दिली.
पारंपरिक कारागीर व हस्तकला विकासाला चालना -
यावेळी कौशल्य विकास विभागाचे राहुल मदनकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. पारंपरिक कारागीर आणि हस्तकला क्षेत्राला चालना देण्यासाठी पीएम विश्वकर्मा योजना उपयुक्त असून, या योजनेच्या माध्यमातून पारंपरिक कौशल्यांचे जतन करण्याबरोबरच त्याच्या विकासालाही मोठ्या प्रमाणात वाव मिळू शकतो, असे त्यांनी सांगितले.
पारंपरिक पद्धतीने व्यवसाय करणाऱ्या कारागिरांना त्यांच्या कौशल्यात आवश्यक सुधारणा करण्यासाठी प्रशिक्षणाची संधी, व्यवसायवृद्धीसाठी आवश्यक मार्गदर्शन आणि आधुनिक साधनांचा वापर करण्याबाबत माहिती मिळणे गरजेचे आहे. यासाठी संबंधित विभागांनी कारागिरांपर्यंत योजना पोहोचवून त्यांना लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करावे, यावरही यावेळी भर देण्यात आला.
तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचविण्याची गरज -
गडचिरोली जिल्ह्यात ग्रामीण तसेच दुर्गम भागात अनेक नागरिक पारंपरिक व्यवसायांवर अवलंबून आहेत. सुतार, लोहार, कुंभार, सोनार, शिंपी, न्हावी, धोबी, चर्मकार, कारागीर आणि विविध हस्तकला व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींचे पारंपरिक कौशल्य आजही मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आहे. मात्र, आधुनिक साधने, भांडवल, प्रशिक्षण आणि बाजारपेठेचा अभाव यामुळे अनेक कारागिरांना व्यवसायाचा विस्तार करणे शक्य होत नाही.
या पार्श्वभूमीवर पीएम विश्वकर्मा योजनेबाबत व्यापक जनजागृती करून पात्र कारागीर व व्यावसायिकांना योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या संधींची माहिती देणे आवश्यक आहे. शासनाच्या योजनांचा योग्य लाभ घेतल्यास पारंपरिक व्यवसायांना आधुनिकतेची जोड मिळून कारागिरांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होऊ शकते.
त्यामुळे जिल्ह्यातील पात्र पारंपरिक कारागीर व व्यावसायिकांनी पीएम विश्वकर्मा योजनेची माहिती घेऊन उपलब्ध सुविधांचा लाभ घ्यावा, तसेच संबंधित विभागांनी योजनांची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.




Petrol Price




