महत्वाच्या बातम्या

 नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या तयारीला वेग


- नोडल अधिकाऱ्यांनी समन्वयाने, नियोजनपूर्वक व कालमर्यादेत जबाबदाऱ्या पार पाडाव्यात - जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी संबंधित नोडल अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वय राखून आपल्या जबाबदाऱ्या अचूकपणे व विहित कालमर्यादेत पूर्ण कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले. निवडणुकीच्या अनुषंगाने आवश्यक असलेल्या सर्व तयारीचा त्यांनी आढावा घेतला असून, मतदान साहित्याचे वितरण, मतदार याद्यांची उपलब्धता, वाहतूक व्यवस्था, टपाली मतपत्रिकांचे व्यवस्थापन आणि स्ट्राँग रूमच्या कामांना प्राधान्य देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक तयारीसंदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रचना इंदुरकर, उपजिल्हाधिकारी (राजशिष्टाचार) इंदिरा चौधरी, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) मलिक विराणी, उपजिल्हाधिकारी गणेश मारकड, उपजिल्हाधिकारी अमोल कुंभार, जिल्हा नियोजन अधिकारी संजय कडू, प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर, जिल्हा खनिकर्म अधिकारी अतुल दौंड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार उपस्थित होते. जिल्ह्यातील नायब तहसीलदार आणि तलाठी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले.

मतदान साहित्याच्या वितरणाचे काटेकोर नियोजन -
निवडणूक कार्यक्रमानुसार २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदानासाठी आवश्यक असलेल्या साहित्याची मागणी, उपलब्धता आणि वितरण वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिले. मतदान साहित्याच्या वितरणासाठी मतदान केंद्रनिहाय नियोजन करून त्यानुसार टेबलची संख्या निश्चित करावी. या कामासाठी आवश्यक अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नियुक्ती आदेश वेळेत निर्गमित करावेत, असे त्यांनी सांगितले.

निवडणुकीशी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचे नियोजनही योग्य पद्धतीने करावे. यासाठी नियोजन भवन येथे प्रशिक्षण आयोजित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. मतपत्रिका आणि मतपेट्या सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी. मतदानासाठी आवश्यक असलेले विशेष पेन तसेच इतर साहित्य पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवावे, जेणेकरून मतदानाच्या दिवशी कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्यास त्यांनी सांगितले.

मतदार याद्या व टपाली मतपत्रिकांवर विशेष लक्ष -
मतदान प्रक्रियेत मतदार याद्यांना महत्त्व असल्याने त्या अचूक व अद्ययावत असाव्यात. प्रत्येक मतदान केंद्रासाठी आवश्यक असलेल्या मतदार याद्यांचे वितरण तातडीने करण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. तसेच टपाली मतपत्रिकांचे वितरण आणि संकलन ही प्रक्रिया जबाबदारीने पार पाडावी. प्राप्त होणाऱ्या टपाली मतपत्रिकांची नोंद व्यवस्थित ठेवून त्यासंदर्भातील अहवाल नियमितपणे अद्ययावत करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

वाहतूक व्यवस्थेसाठी स्वतंत्र नियोजन -
निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी वाहतूक व्यवस्थेचे नियोजन काटेकोरपणे करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने वाहन अधिग्रहण, वाहनांचे व्यवस्थापन आणि वाहतूक आराखडा अचूक तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. नागपूर जिल्ह्यातील संबंधित सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार वाहने उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी. प्रत्येक मतदान केंद्रासाठी आवश्यक वाहनांची संख्या व उपलब्धता लक्षात घेऊन वाहतुकीचे नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले.

या कामासाठी तहसीलदार आणि तलाठी यांच्यावर आवश्यक जबाबदाऱ्या सोपवून सर्व संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय राखावा. वाहनांची उपलब्धता आणि त्यांचे योग्य व्यवस्थापन यामुळे मतदान प्रक्रियेदरम्यान निर्माण होणाऱ्या संभाव्य अडचणी टाळता येतील, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी दक्ष राहण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

स्ट्राँग रूमचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश -
निवडणुकीच्या पुढील टप्प्यांच्या दृष्टीने स्ट्राँग रूमच्या प्रलंबित कामांनाही जिल्हाधिकाऱ्यांनी प्राधान्य देण्यास सांगितले. या कामांसंदर्भातील अंदाजपत्रक तातडीने सादर करून प्रत्यक्ष कामाला विलंब न करता सुरुवात करावी. निवडणूक कार्यक्रमानुसार २७ ऑक्टोबर २०२६ रोजी मतमोजणी नियोजित असल्याने त्यापूर्वी आवश्यक कामे जलदगतीने पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

निवडणूक कामात हलगर्जीपणा नको -
निवडणुकीशी संबंधित प्रत्येक कामाचे नियोजन वेळेत करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. यासाठी सर्व नोडल अधिकारी व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय राखावा. सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्यांमध्ये कोणतीही कसूर होणार नाही, याची दक्षता घ्यावी. निवडणूक प्रक्रियेतील सर्व कामे अचूक, पारदर्शक आणि निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्यावर भर द्यावा, असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्पष्ट केले. नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदानापासून मतमोजणीपर्यंतच्या प्रत्येक टप्प्याची तयारी वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या आहेत.





  Print






Related Photos