महत्वाच्या बातम्या

 वाघाचा हल्ला : जर्सी गाय ठार


- नवखळा जंगल परिसरातील घटना; नुकसानभरपाई देण्याची पशुपालकाची मागणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : नागभीड वनपरिक्षेत्रांतर्गत नवखळा जंगल परिसरात दबा धरून बसलेल्या वाघाने दुधाळ जर्सी गायीवर अचानक हल्ला करून तिला ठार केल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरातील पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वन विभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

नवखळा येथील गुराखी नेहमीप्रमाणे गावातील जनावरे चारण्यासाठी जंगल परिसरात घेऊन गेला होता. जनावरे जंगलात चरत असताना दुपारच्या सुमारास दबा धरून बसलेल्या वाघाने वसंत गायकवाड यांच्या दुधाळ जर्सी गायीवर अचानक हल्ला केला. वाघाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेली गाय जागीच ठार झाली.

वाघाने गायीवर हल्ला केल्याचे लक्षात येताच गुराखीने आरडाओरड करून परिसरातील नागरिकांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर वन विभागाला याबाबत कळविण्यात आले. माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसराची पाहणी करून मृत गायीची पाहणी केली.

या घटनेमुळे नवखळा परिसरातील पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जंगलालगतच्या परिसरात वाघाचा वावर वाढल्याने जनावरे चारण्यासाठी जंगलात नेणे धोकादायक ठरत असल्याचे पशुपालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे वन विभागाने वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून नागरिक व पशुपालकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, मृत गायीचा वन विभागाने पंचनामा करून घटनेची सखोल चौकशी करावी आणि नियमानुसार नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी पशुपालक वसंत गायकवाड यांनी केली आहे. दुधाळ गाय ठार झाल्याने आपले मोठे आर्थिक नुकसान झाले असून, शासनाकडून योग्य भरपाई मिळावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.





  Print






Related Photos