महत्वाच्या बातम्या

 माजी सैनिकांसाठी १६ ऑक्टोबरला सुरेश भट सभागृहात विशेष रोजगार मेळावा


- कॉर्पोरेट व औद्योगिक क्षेत्रातील रोजगाराच्या संधी उपलब्ध

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा तसेच त्यांच्या अवलंबितांना नागरी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पुनर्वसन महासंचालनालयाच्या (डीजीआर) वतीने शुक्रवार, १६ ऑक्टोबर रोजी नागपुरात विशेष रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७ वाजतापासून रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात हा मेळावा होणार आहे.

संरक्षण मंत्रालयाच्या माजी सैनिक कल्याण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या पुनर्वसन महासंचालनालयाच्या वतीने माजी सैनिकांचे पुनर्वसन आणि त्यांना नागरी कार्यक्षेत्रात सक्षम करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या रोजगार मेळाव्यात भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलातील माजी सैनिकांना कॉर्पोरेट तसेच औद्योगिक क्षेत्रातील प्रमुख नियोक्त्यांशी संवाद साधण्याची आणि रोजगाराच्या संधी मिळविण्याची संधी उपलब्ध होणार आहे. सुरक्षा, माहिती तंत्रज्ञान (आयटी), प्रशासन, लॉजिस्टिक्स, आरोग्यसेवा आणि अभियांत्रिकी यांसह विविध क्षेत्रांतील रोजगाराच्या संधी या मेळाव्याच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत.

याशिवाय, माजी सैनिकांच्या सोयीसाठी स्पर्श (SPARSH) आणि इच्स (ECHS) यांचे स्वतंत्र स्टॉलही उभारण्यात येणार आहेत. या स्टॉलच्या माध्यमातून स्पर्श आणि इच्स संदर्भातील माजी सैनिकांच्या अडचणी व समस्यांचे निराकरण करण्यासाठी मार्गदर्शन आणि आवश्यक सहकार्य करण्यात येणार आहे.

नागपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा तसेच माजी सैनिकांच्या अवलंबितांनी या रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन उपलब्ध संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर आनंद पाथरकर यांनी केले आहे.





  Print






Related Photos