गणेश दर्शनासोबत रोजगार व कौशल्य विकास योजनांची माहिती भंडाऱ्याचा राजा गणेश मंडळातील लोकसंवादाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : गणेश दर्शनासोबतच शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधींची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने भंडाऱ्याचा राजा गणेशोत्सव मंडळात लोकसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गणेश दर्शनासाठी आलेल्या नागरिकांनी शासनाच्या विविध योजना व युवकांसाठी उपलब्ध रोजगाराच्या संधींबाबत माहिती जाणून घेतली.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने अविनाश खेडीकर आणि अमित माळवदे यांनी उपस्थित भाविकांना जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध कौशल्य विकास योजनांची माहिती दिली. युवकांसाठी उपलब्ध असलेले अल्पमुदतीचे तसेच दीर्घमुदतीचे अभ्यासक्रम, विविध कौशल्य प्रशिक्षण सत्रे, प्रशिक्षणासाठी उपलब्ध संधी आणि प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या संधी याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
२९ सप्टेंबरला रोजगार महाकुंभ -
भंडारा जिल्ह्यातील युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी २९ सप्टेंबर रोजी रोजगार महाकुंभाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या रोजगार महाकुंभाच्या माध्यमातून मोठ्या संख्येने युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून, जिल्ह्यातील युवकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी भंडाऱ्याचा राजा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष नयन वंजारी यांनी जिल्हा माहिती कार्यालयाच्या प्रतिनिधींचे स्वागत केले.
यावेळी कार्याध्यक्ष मंगेश वंजारी यांच्यासह आकाश रावणकर, अंशू बावणे, अमोल घाटोळे, मनोज बावनकर तसेच मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. लोकसंवाद कार्यक्रमादरम्यान भाविकांना शासनाच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती देणारी माहितीपत्रके वितरित करण्यात आली. गणेश दर्शनासाठी आलेल्या नागरिकांनी या माहितीचा लाभ घेत रोजगार, कौशल्य प्रशिक्षण तसेच युवकांसाठी उपलब्ध असलेल्या विविध योजनांबाबत उत्सुकतेने माहिती जाणून घेतली.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून योजनांचा जनतेशी थेट संवाद -
गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या लोककल्याणकारी योजना आणि उपक्रमांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने लोकसंवाद उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील विविध गणेशोत्सव मंडळांमध्ये या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असून, त्याला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. धार्मिक उत्सवाच्या निमित्ताने नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होत असल्याने शासनाच्या योजना, कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधींबाबत जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम प्रभावी माध्यम ठरत आहे.




Petrol Price




