महत्वाच्या बातम्या

 १०० हून अधिक फुलपाखरांच्या रंगीबेरंगी दुनियेत गोंदिया बहरला!


- प्रत्येक फुलपाखराचे विशिष्ट वनस्पतीशी नाते; संवर्धनासाठी पोषक वनस्पती ठरतात महत्त्वाच्या

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या समृद्ध वनसंपदा आणि जैवविविधतेमुळे गोंदिया जिल्ह्यात सध्या फुलपाखरांचा हंगाम बहरला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १०० हून अधिक फुलपाखरांच्या प्रजातींची नोंद झाली असून, या रंगीबेरंगी जीवसृष्टीकडे नागरिक, विद्यार्थी आणि निसर्गप्रेमींचे विशेष लक्ष वेधले जात आहे. फुलपाखरांचे आकर्षक सौंदर्य जितके मनमोहक आहे, तितकेच त्यांच्या जीवनचक्रात विशिष्ट वनस्पतींची असलेली भूमिका आणि परिसंस्थेतील त्यांचे महत्त्वही अधोरेखित होत आहे.

फुलपाखरे ही केवळ निसर्गाची शोभा वाढविणारी जीवसृष्टी नसून जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाचा घटक आहेत. फुलपाखरांच्या संवर्धनासाठी त्यांच्या अधिवासाचे संरक्षण करण्यासोबतच त्यांच्या अळ्यांना खाद्य पुरविणाऱ्या विशिष्ट वनस्पतींचे संवर्धन करणे आवश्यक आहे.

प्रत्येक फुलपाखराची होस्ट प्लांट शी नाळ -

फुलपाखरू कोणत्याही झाडावर अंडी घालत नाही. अंड्यातून बाहेर पडणाऱ्या अळीला कोणत्या वनस्पतीची पाने खाता येतील, यावरून मादी फुलपाखरू अंडी घालण्यासाठी विशिष्ट वनस्पतीची निवड करते. या वनस्पतीला पोषक वनस्पती किंवा होस्ट प्लांट असे म्हणतात. गोंदिया जिल्ह्यात लिंबू, कढीपत्ता आणि बेल यांसारख्या वनस्पतींवर लाइम बटरफ्लाय, कॉमन मॉर्मन आणि महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू असलेले ब्लू मॉर्मन आढळतात. रुई आणि मंदार या वनस्पती स्ट्राइप टायगर, ब्लू टायगर आणि कॉमन क्रो यांसारख्या प्रजातींच्या अळ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत.

त्याचप्रमाणे अरंडी आणि सीताफळावर कॉमन कॅस्टर, तर कडुलिंब व करंजावर कॉमन सेरुलियन आढळते. पिंपळ, वड आणि उंबर यांसारख्या वृक्षांशी कॉमन लिओपार्ड, यलो पॅन्सी आदी प्रजातींचे नाते आहे. त्यामुळे फुलपाखरांच्या संवर्धनासाठी केवळ फुलझाडे लावण्यापेक्षा त्यांच्या जीवनचक्रासाठी आवश्यक असलेल्या पोषक वनस्पतींची उपलब्धता वाढविणे गरजेचे आहे.

अळी पानांवर, तर प्रौढ फुलपाखरू मधुरसावर -
फुलपाखराच्या जीवनातील अळी आणि प्रौढ या दोन अवस्थांमध्ये आहाराची पद्धत वेगळी असते. अळीला जबडा असल्यामुळे ती होस्ट प्लांटची पाने खाते आणि या काळात तिची झपाट्याने वाढ होते. पुढे अळीचे रूपांतर कोषात होते आणि त्यातून प्रौढ फुलपाखरू बाहेर पडते. प्रौढ फुलपाखराच्या तोंडाजवळ लांब नळीप्रमाणे प्रोबॉसिस असते. या नळीच्या साहाय्याने ते फुलांमधील मधुरस शोषते. तलाव, नदी किंवा ओलसर जमिनीच्या काठावर फुलपाखरे चिखलातून क्षारयुक्त पाणी आणि शरीरासाठी आवश्यक खनिजे घेतानाही दिसतात. त्यामुळे त्यांच्या अधिवासात पाणवठे आणि ओलसर जागांचेही महत्त्व अधोरेखित होते.

पावसाळ्यात विविधता, हिवाळ्यात रंगांची उधळण -
फुलपाखरांच्या दृष्टीने जून ते सप्टेंबर हा पावसाळी कालावधी सर्वाधिक विविधतेचा मानला जातो. या काळात ब्लू मॉर्मन, कॉमन मॉर्मन, टायगर गट आणि जेझेबेल यांसारख्या प्रजाती मोठ्या संख्येने आढळतात. पावसामुळे वनस्पतींची वाढ झालेली असल्याने फुलपाखरांच्या जीवनचक्रासाठी पोषक वातावरण निर्माण होते.

२ ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा गोंदिया परिसरात फुलपाखरांचे निरीक्षण करण्यासाठी उत्तम काळ मानला जातो. या कालावधीत पेंटेड लेडी, कॉमन इमिग्रंट आणि लाइम बटरफ्लाय यांसारख्या प्रजाती मोठ्या प्रमाणात दिसतात. थंड हवामानामुळे फुलपाखरे अधिक काळ सक्रिय राहतात आणि निसर्गप्रेमींना त्यांच्या निरीक्षणाची चांगली संधी मिळते. तर मार्च ते मे या उन्हाळ्याच्या कालावधीत फुलपाखरांची संख्या तुलनेने कमी असते. मात्र, यलो पॅन्सी, लेमन पॅन्सी आणि कॉमन कॅस्टर यांसारख्या उष्णता सहन करणाऱ्या प्रजाती पाणवठ्यांच्या परिसरात आढळून येतात.

घराच्या परसबागेपासून शाळेपर्यंत बटरफ्लाय गार्डन -
फुलपाखरांच्या संवर्धनासाठी केवळ जंगलांवर अवलंबून राहण्याची गरज नाही. कढीपत्ता, लिंबू, बेल, रुई, अरंडी, कडुलिंब, पिंपळ, उंबर यांसह घाणेरी, टणटणीसारख्या रानवनस्पतींचे संवर्धन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. शाळा, अंगणवाडी, घराची परसबाग तसेच शेताच्या बांधावर या वनस्पतींची लागवड केल्यास छोट्या-छोट्या बटरफ्लाय गार्डन विकसित करता येतील. अशा बागांमुळे फुलपाखरांना अंडी घालण्यासाठी आणि अळ्यांना खाद्य मिळण्यासाठी आवश्यक वनस्पती उपलब्ध होतील. विद्यार्थ्यांना फुलपाखरांचे जीवनचक्र जवळून अभ्यासण्याची संधी मिळेल आणि जैवविविधतेबाबतची जाणीवही वाढेल.

चार टप्प्यांत पूर्ण होते फुलपाखराची जीवनयात्रा -
फुलपाखराचे जीवनचक्र अंडी, अळी, कोष आणि प्रौढ फुलपाखरू अशा चार टप्प्यांत पूर्ण होते. अंडी साधारण तीन ते पाच दिवसांत उबतात. त्यानंतर अळीची अवस्था साधारण १५ ते २० दिवसांची असते. या काळात अळी मोठ्या प्रमाणात पाने खाते आणि शरीराची वाढ करते.

यानंतर कोषावस्था सुरू होते. ही अवस्था साधारण १० ते १५ दिवसांची असते. त्यानंतर कोषातून रंगीबेरंगी प्रौढ फुलपाखरू बाहेर पडते.बहुतांश छोट्या प्रजातींच्या प्रौढ फुलपाखरांचे आयुष्य साधारण एक ते दोन आठवड्यांचे असते. मॉर्मन आणि टायगरसारख्या मोठ्या प्रजातींचे आयुष्य साधारण तीन ते चार आठवड्यांचे असते. स्थलांतर करणाऱ्या काही प्रजातींचे आयुष्य यापेक्षा अधिक असू शकते.

बटरफ्लाय टुरिझम मुळे रोजगाराच्या संधी -
गोंदिया जिल्ह्यातील समृद्ध वनसंपदा आणि जैवविविधतेमुळे बटरफ्लाय टुरिझम लाही चालना मिळत आहे. वाघांसोबत विविध प्रजातींच्या फुलपाखरांचे निरीक्षण करण्यासाठी निसर्गप्रेमी आणि पर्यटक जिल्ह्याकडे आकर्षित होत आहेत. फुलपाखरांचे निरीक्षण, छायाचित्रण आणि जैवविविधतेचा अभ्यास यामुळे स्थानिक युवकांना निसर्ग मार्गदर्शक म्हणून काम करण्याच्या संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे फुलपाखरे ही केवळ निसर्गाची रंगीबेरंगी शोभा नसून, पर्यावरण संवर्धनासोबतच निसर्ग पर्यटन आणि स्थानिक रोजगारनिर्मितीलाही हातभार लावणारा महत्त्वाचा नैसर्गिक ठेवा ठरत आहेत.





  Print






Related Photos