विनोबा अॅप तर्फे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भंडारा यांच्या वतीने ऑगस्ट २०२६ महिन्यात प्रकल्पस्तरीय विनोबा अॅप – पोस्टर ऑफ द मंथ अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमातून आदिवासी आश्रमशाळांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी दीपक हेडाऊ होते. यावेळी कार्यालय अधीक्षक सुहास वैरागडे, विनोबा अॅप प्रकल्प अधिकारी निखिल गजभिये, आश्रमशाळांचे मुख्याध्यापक तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते.
ऑगस्ट महिन्यासाठी सुशिल आदिवासी प्राथमिक/माध्यमिक आश्रमशाळा, माडगी (टेके.), ता. जि. भंडारा येथील दिलीप बोरकर तसेच आडकुजी चौधरी आदिवासी प्राथमिक/माध्यमिक आश्रमशाळा, चांदपूर येथील मीना बिसेन यांची उत्कृष्ट कार्यासाठी निवड करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते दोन्ही शिक्षकांना प्रमाणपत्र व शैक्षणिक साहित्य देऊन गौरविण्यात आले.
यावेळी प्रकल्प अधिकारी दीपक हेडाऊ यांनी शिक्षकांच्या कठोर परिश्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शिक्षकांनी सातत्याने प्रयत्नशील राहावे, असे आवाहन करत त्यांनी पुरस्कारप्राप्त शिक्षकांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना पुरस्कारप्राप्त शिक्षकांनी विनोबा अॅप च्या माध्यमातून मिळणाऱ्या मार्गदर्शन व सन्मानाबद्दल आभार व्यक्त केले. आधुनिक शिक्षण पद्धती, तंत्रज्ञानाचा वापर आणि आवश्यक प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षकांना सक्षम करण्यासाठी विनोबा अॅपचे योगदान महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
या उपक्रमामुळे शिक्षकांमध्ये नवीन उत्साह, प्रेरणा आणि सकारात्मक स्पर्धेची भावना निर्माण होत असून, आश्रमशाळांमधील शैक्षणिक गुणवत्तेत सकारात्मक बदल घडून येण्यास मदत होत आहे असे यावेळी सांगण्यात आले.




Petrol Price




