आर्वीत कोंबड्यांच्या झुंजीवर लाठी पोलिसांचा छापा : ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : कोंबड्यांच्या झुंजी लावून त्यावर पैशांचा जुगार खेळविण्याचा प्रकार आर्वी परिसरात सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळताच लाठी पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, सात कोंबडे, १२ दुचाकी, चार कात्या आणि रोख रक्कम असा एकूण ५ लाख ३ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकारात तीन कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचेही समोर आले आहे.
३ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास मौजा आर्वी गावाच्या मागे नाल्यालगत हा जुगार सुरू होता. लाठी उपपोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अशोक मंजुळकर यांना याबाबत गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस पथक सहित घटनास्थळी धाड टाकली. यावेळी कोंबड्यांच्या झुंजीवर पैशांचा डाव लावणारे इसम आढळून आले.
पोलिसांनी घटनास्थळावरून प्रवीण सुरेश दरेकर ३५ वर्षे रा. शिवाजी वार्ड, राजुरा आणि प्रकाश मोतीराम वानखेडे ६२ वर्षे रा. विरूर या दोघांना ताब्यात घेतले. तसेच घटनास्थळावरून सात कोंबडे त्यापैकी तीन मृत, १२ मोटारसायकली, चार कात्या आणि १ हजार २५० रुपये रोख असा एकूण ५ लाख ३ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी घटनास्थळावर असलेले दहा मोटारसायकलस्वार चालक पसार झाले. या प्रकरणी लाठी उपपोलीस ठाण्यात अप क्रमांक ६७/२६ अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२ (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुशांत कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली लाठी उपपोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत लभाने, पोलीस हवालदार अशोक मंजुळकर, महिला पोलीस हवालदार सौजन्या जंजिरालावार, पोलीस शिपाई चेतना झाडे आणि वनरक्षक कार्तिकस्वामी केंद्रे यांनी केली.




Petrol Price




