वर्षाअखेरीस पेट्रोल व डिझेलच्या दरांनी मंगळवारी केली वर्षातील नीचांकी दराची नोंद


वृत्तसंस्था / नवीदिल्ली :  सरत्या वर्षाच्या अखेरीस पेट्रोल व डिझेलच्या दरांत   मंगळवारी चालू वर्षातील नीचांकी दराची नोंद केली. दुसरीकडे, डिझेलने मार्चनंतरचा नीचांकी दर नोंदवला आहे. मुंबईत मंगळवारी पेट्रोलचा दर प्रतिलिटर ७५.४१ रुपयांपर्यंत घसरला. तर, डिझेलने प्रतिलिटर ६६.७९ रुपये दराची नोंद केली. 
आंतरराष्ट्रीय बाजारात सोमवारी कच्चा इंधनदरात तब्बल सहा टक्क्यांनी घसरण झाली. कच्च्या इंधनाच्या किंमतीत मोठी घसरण होत असल्याचा थेट लाभ भारतासारख्या इंधनगरजू देशांना होत आहे. पेट्रोल व डिझेलच्या किमतीत सोमवारी प्रतिलिटर अनुक्रमे २१ व १९ पैशांची कपात करण्यात आली होती. मंगळवारी पेट्रोलच्या दरात आणखी सात पैशांची कपात झाली. तर, डिझेलचे दर जैसे थे राहिले. यामुळे मुंबईत पेट्रोल, डिझेलने प्रतिलिटर ७५.४१ व ६६.७९ रुपये असा दिलासादायक दर गाठला. राजधानी नवी दिल्लीमध्ये पेट्रोल सत्तर रुपयांच्या खाली गेले आहे. दिल्लीत पेट्रोल, डिझेलने अनुक्रमे ६९.७९ व ६३.८३ रुपये दराची नोंद केली. १ जानेवारी २०१८ला नवी दिल्लीमध्ये एक लिटर पेट्रोलसाठी ६९.९७ रुपये तर, डिझेलसाठी ५९.७० रुपये मोजावे लागत होते. 
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या इंधनाच्या दरात सोमवारी सहा टक्क्यांहून अधिक प्रमाणात घसरण नोंदविण्यात आली. यामुळे क्रूड ऑइलचा दर प्रतिबॅरल ४२.५३ अमेरिकी डॉलरपर्यंत घसरला. कच्च्या इंधनदराचा हा गेल्या वर्षभरापेक्षा अधिक कालावधीतील नीचांक ठरला. अमेरिकेच्या केंद्रीय फेडरल बँकेने व्याजदरांत वाढ केल्यानंतर शेअर बाजारात तीव्र पडसाद उमटले आहेत. या व्याजदरवाढीवरून अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. फेडरल बँक हीच आपल्या अर्थव्यवस्थेपुढील सर्वात मोठी समस्या आहे, अशी खोचक शेरेबाजी ट्रम्प यांनी केली आहे. शिकागो येथील प्राइस फ्युचर्स ग्रुपचे विश्लेषक फिल फ्लिन यांनी सांगितले की, 'अमेरिकेची अर्थव्यवस्था खालावणार असल्याची भीती शेअर बाजारात व्यक्त होत आहे. अर्थव्यवस्थेतील संभाव्य बदलांमुळे कच्च्या तेलाची मागणी प्रचंड कमी होईल, अशी धास्तीही गुंतवणूकदारांना वाटत आहे. याचाच परिणाम म्हणून इंधनदर कोसळत आहेत.'    Print


News - World | Posted : 2018-12-26


Related Photos