मराठा मुलांना ४० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्जावर व्याजमाफी : अण्णासाहेब पाटील महामंडळाची योजना
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी ४० लाख रुपयांची व्याजमाफी शैक्षणिक कर्ज योजना आणण्याचा निर्णय अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने घेतला आहे.
या विषयासंदर्भातील शासन निर्णय लवकरच जारी होईल, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली.
पाटील म्हणाले की, मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जावर लागणारे व्याज महामंडळाने भरावे, अशी मागणी मराठा समाजबांधवांकडून करण्यात येत होती. या मागणीची दखल घेऊन महामंडळाच्या बोर्ड बैठकीत मराठा विद्यार्थ्यांसाठी ४० लाख रुपयांपर्यंतच्या शैक्षणिक कर्जावर व्याज परतावा देण्याचा निर्णय घेतला असून याबाबतचा शासन निर्णय लवकरच शासनाकडून जाहीर करण्यात येणार आहे.
११ कोटी ८४ लाखांचा गट कर्ज व्याज परतावा -
गट कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत शासकीय नोंदणीकृत संस्था, कंपन्यांना उद्योगासाठी ५० लाख रुपयांपर्यंतच्या कर्ज मर्यादेसाठी घेतलेल्या कर्जावर १२ टक्के अथवा १५ लाखांच्या मर्यादेत कर्ज परतावा दिला जातो. या अंतर्गत ६२४ जणांना महामंडळाने पात्रता प्रमाणपत्र प्रदान केले. यापैकी ४७६ लाभार्थ्यांना बँकेकडून ११ कोटी ८४ लाख रुपये व्याज परतावा देण्यात आला.
गट प्रकल्प कर्ज योजनेंतर्गत १० लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज उद्योगांसाठी सात वर्षांकरिता व्याज माफी योजना राबविली जाते. या योजनेत ३५ अर्जदारांना ३ कोटी ३५ लाख कर्ज वाटप करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.
महामंडळाचे लवकरच कॉल सेंटर -
महामंडळाच्या योजनांची माहिती सर्वसामान्य मराठा समाजाला व्हावी, तसेच महामंडळाकडून कर्ज घेतल्यानंतर व्याज परतावा मिळण्यात काही अडचणी येत असेल तर याविषयीच्या तक्रारींचे निरसन करणे आणि कर्ज प्रस्तावावर बँकेने काय निर्णय घेतला, याविषयी माहिती देण्यासाठी महामंडळाचे कॉल सेंटर लवकर सुरू होणार असल्याचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.
News - Rajy