सिरोंचात धान खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी : आंदोलनाचा इशारा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालूका प्रतिनिधी / सिरोंचा : सिरोंचा तालुक्यातील मेदारम, नारायणपूर, अमरावती, करसपाली आणि रंगायपली या गावांमध्ये तात्काळ धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. धान खरेदी केंद्रे सुरू न झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, तालुक्यातील शेतकऱ्यांचे धान मोठ्या प्रमाणात तयार असून शासनामार्फत अद्याप खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले नाही. परिणामी, शेतकऱ्यांना आपले धान खासगी व्यापाऱ्यांना कमी दरात विकावे लागत आहे. त्यामुळे शासनाच्या हमीभाव योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नसल्याने त्यांच्यात तीव्र नाराजी आहे.
धान खरेदी केंद्रे तातडीने सुरू करून शेतकऱ्यांना योग्य दर मिळवून द्यावा व त्यांना आर्थिक दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. निवेदनाला परिसरातील शेतकरी आणि नागरिकांनी मोठा पाठिंबा दर्शविला.
या निवेदनावर माजी उपसरपंच केशव नस्कुरी, वेंकणा भीमकरी, उपसरपंच अशोक हरी यांच्यासह अनेक शेतकरी व ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (भाकपा) तालुका सचिव रवि बारसागंडी यांनी प्रशासनाने या मागणीवर तात्काळ कार्यवाही करावी, अन्यथा शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला. प्रशासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




