महत्वाच्या बातम्या

 ताडोबा महोत्सवात वासेरा उत्कृष्ट गाव म्हणुन सन्मानित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : देश- विदेशातील पर्यटकांमध्ये सर्वात लोकप्रिय असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपुर तर्फे वन्यजीव संरक्षण, शास्वत पर्यटन आणि स्थानिक वारसा यांना चालना देण्यासाठी ताडोबा महोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवामध्ये ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत बफ्फर झोन क्षेत्रामध्ये येत असलेल्या वासेरा या गावाची पर्यावरणाचा जीवनचक्र, वृक्ष संवर्धन, जंगल सृष्टी, जैवविविधतेचे रक्षण या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट गाव म्हणुन सन्मानित करण्यात आले.

पर्यावरणाच्या जीवनचक्राचा महत्त्वाचा घटक असलेला वाघ वाचला तर जंगल आणि जीवसृष्टी वाचेल. त्यामुळे मानवी जीवन आणि सृष्टीच्या रक्षणासाठी वाघ वाचविण्याच्या संकल्पात सिंदेवाही तालुक्यातील वासेरा या गावचे मोठे योगदान असल्यामुळे या सन्मानातुन गावातील वनविभागाच्या इको डेव्हलेपमेंट समिती व ग्रामपंचायत समिती यांना रोख रक्कम ५० हजार देवुन वनविभागाला भरघोस सहकार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. ही बक्षिसाची रक्कम ग्रामविकासासाठी वापरण्यात येणार आहे.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा केवळ राज्य आणि देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम व्याघ्र प्रकल्प आहे. या प्रकल्पाला भेट देण्यासाठी विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती पर्यटनासाठी येत असतात. या ताडोबाच्या वैभवाची जतन ही मानवाकडुन व्हायला पाहिजे यासाठी ताडोबाच्या शेजारी असलेल्या गावांना संवर्धनाच्या प्रयत्नामध्ये सहभागी करुन घेत मौल्यवान जैवविविधतेचे रक्षण झाले पाहीजे या करिता स्थानिकांना आर्थिक प्रगतीच्या संध्या उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.

हा पुरस्कार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी वासेरा गावाचे सरपंच महेश पाटील बोरकर, ईको डेव्हलेपमेंट समितीचे अध्यक्ष जोगेश्वर आनंदे, ग्रामपंचायत सदस्य नागेश बंडीवार, महेंद्र सुर्यवंशी, वनपरीक्षेत्र अधिकारी विदेशकुमार दि. गलगट उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos