सूडबुद्धीने दाखल केलेला खोटा गुन्हा उच्च न्यायालयाकडून रद्द : ठाणेगांव येथील दोन तरुणांना मोठा दिलासा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : वनविभागाच्या कारवाईचा राग मनात धरून आणि जुन्या कौटुंबिक वादाचा सूड उगवण्यासाठी दोन निष्पाप व्यक्तींना मारहाणीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा एका महिला तक्रारदाराचा डाव मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामुळे पार फसला आहे. सूडबुद्धीने दाखल करण्यात आलेला हा खोटा गुन्हा न्यायालयाने रद्द केला असून, आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव येथील गंगाधर चिचघरे आणि मिथुन ढोडरे (दोघेही रा. ठाणेगाव) या अर्जदारांना मोठा न्याय मिळाला आहे. या निकालामुळे आता खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या महिलेसह तिला साथ देणारे तिचे पती व नातेवाईक यांच्या अडचणीत मोठी वाढ होणार आहे.
या प्रकरणाची सविस्तर पार्श्वभूमी अशी की, तक्रारदार महिला निरंजना अनिल ढोडरे हिच्या घरावर काही दिवसांपूर्वी वनविभागाने छापा मारून बेकायदेशीर सागवान जप्त केले होते. हा छापा गंगाधर चिचघरे आणि मिथुन ढोडरे यांनी दिलेल्या गुप्त माहितीवरून पडल्याचा संशय संबंधित महिलेला आला. त्यातच अर्जदारांचे या महिलेच्या कुटुंबासोबत आधीपासूनच कौटुंबिक वाद सुरू होते. याच संशयाचा आणि जुन्या वादाचा राग मनात धरून, केवळ बदला घेण्याच्या उद्देशाने महिलेने वनविभागाच्या कारवाईनंतर अवघ्या दोन दिवसांत अर्जदारांविरुद्ध मारहाणीची खोटी तक्रार आरमोरी पोलीस ठाण्यात दिली.
या तक्रारीत महिलेने आपल्या पतीला आणि जवळच्या नातेवाइकांनाच मुख्य साक्षीदार बनवले होते. आरमोरी पोलिसांनीही या प्रकरणात घटनेच्या वेळेचे सीसीटीव्ही फुटेजसारखे महत्त्वाचे आणि निष्पापपणा सिद्ध करणारे पुरावे पूर्णपणे दुर्लक्षित केले आणि घाईघाईने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
पोलिसांच्या या एकतर्फी कारवाईविरोधात अर्जदारांनी अधिवक्ता व्ही. एन. मोरंडे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात धाव घेतली. प्रकरणाची गंभीर दखल घेत माननीय न्यायमूर्ती वृषाली व्ही. जोशी यांनी सुनावणी दरम्यान स्पष्ट केले की, वनविभागाच्या छाप्यानंतर केवळ सूड घेण्याच्या उद्देशानेच हा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असून हा फौजदारी प्रक्रियेचा गैरवापर आहे. न्यायालयाने पोलिसांची एफआयआर आणि दोषारोपपत्र पूर्णपणे बाद ठरवले.
उच्च न्यायालयाच्या या निकालानंतर निर्दोषत्व सिद्ध झालेले दोन्ही अर्जदार आता खोटा गुन्हा दाखल करून मानसिक आणि आर्थिक त्रास देणाऱ्या संबंधित महिलेविरुद्ध मानहानीचा दिवाणी दावा आणि फौजदारी स्वरूपाची कडक कायदेशीर कारवाई करणार आहेत. विशेष म्हणजे, या खोट्या गुन्ह्याच्या एफआयआरमध्ये महिलेचा पती आणि जवळचे नातेवाईकच साक्षीदार होते. त्यामुळे कौटुंबिक वादातून चिडून खोट्या गुन्ह्यात सहकार्य करणाऱ्या आणि न्यायालयात खोटी साक्ष देणाऱ्या या नातेवाईकांवरही आता कडक कायदेशीर कारवाईची टांगती तलवार असून त्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




