वडगावजवळ खासगी बसचा अपघात : १८ प्रवासी जखमी, तिघांची प्रकृती गंभीर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालूक प्रतिनिधी / धानोरा : धानोरा-मुरूमगाव मार्गावरील वडगावजवळ रविवारी दुपारी खासगी प्रवासी बस पलटून भीषण अपघात झाला. या अपघातात १८ प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी गडचिरोली येथे हलविण्यात आले. ही घटना रविवारी (२४) दुपारी सुमारे १२.४५ वाजताच्या दरम्यान घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, दल्ली (छत्तीसगड) येथून गडचिरोलीकडे येणारी सीजी ०८ एम ०३८८ क्रमांकाची खासगी ट्रॅव्हल्स बस वडगावजवळ आली असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस रस्त्याच्या कडेला जाऊन पलटली. अपघातावेळी बसमध्ये चालक व वाहकासह एकूण ३६ प्रवासी प्रवास करीत होते. अचानक झालेल्या अपघातामुळे बसमधील प्रवाशांमध्ये घबराट पसरली आणि एकच गोंधळ उडाला.
घटनेची माहिती मिळताच धानोरा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिक तसेच भाजप पदाधिकाऱ्यांनीही मदतकार्य करत जखमींना बसमधून बाहेर काढले. त्यानंतर रुग्णवाहिकांच्या साहाय्याने सर्व जखमींना धानोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमींना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी गडचिरोली येथे रेफर करण्यात आले.
या अपघातात नीलकंठ वाडके (५८, मारोडा), चांदणी रामटेके (२३, तोरगाव) आणि चालक रवी चावरे (३५, दल्ली, छत्तीसगड) हे गंभीर जखमी झाले आहेत. तर कृष निमगडे, बंडू खोब्रागडे, मिस्टी नरोटे, चांदणी साहू, पंचराम पटेल, देवदास झगराह, उदय देवांगण, ललिता साहू, जानको पोया, लता नरोटे, भूपेंद्र साहू, गुलाबो पटेल, शेखर उईके, गोपीचंद कुणबी आणि प्रदीप गावडे हे किरकोळ जखमी झाले आहेत.
दरम्यान, अपघातग्रस्त रस्ता अत्यंत खराब असल्याने बसचा वेग कमी होता. तसेच बस पलटल्यानंतर ती रस्त्यालगत असलेल्या झाडाला अडकल्याने मोठी जीवितहानी टळल्याचे नागरिकांनी सांगितले. अपघातानंतर काही प्रवाशांनी चालकाने मद्यप्राशन केल्याचा आरोप केला असून पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




