महत्वाच्या बातम्या

 जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी कोरची येथे बेमुदत संप


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / कोरची : जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या राज्य सरकारच्या कर्मचार्‍यांनी १४ मार्च पासून बेमुदत संप सुरू केला असून यामुळे आज सरकारी कार्यालयात मोठी अडचण निर्माण झाली आहे. कोरची तालुक्यातील कर्मचारी हे या संपात सहभागी झाले आहे. आज सकाळी तालुक्यातील कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या वतीने एकच मिशन जुनी पेन्शनच्या घोषणा देत तीव्र निदर्शने करण्यात आली आहेत. राज्य सरकारने कुठलीही कारवाई केली तरी आम्ही मागे हटणार नाही, भले आंदोलनाला बरेच दिवस लागले तरी चालेल कुठल्याही परिस्थितीत जुनी पेन्शन घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असा गंभीर इशारा यावेळी कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

शाळा, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, महाविद्यालय, तहसील कार्यालय, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र तसेच पंचायत समिती अंतर्गत असलेल्या विविध विभागात पूर्णपणे शुकशुकाट दिसून येत असल्याने कामकाजावर मोठ्या प्रमाणात परिणाम होताना दिसून येत आहे. विशेष म्हणजे आरोग्य विभागातील कर्मचारी या संपात सहभागी झाले आहे.

आज सकाळपासूनच विविध विभागातील कर्मचारी पंचायत समिती तहसील कार्यालय तसेच पंचायत समिती समोर बसून घोषणा देत शासनाच्या प्रति रोष व्यक्त करत आहेत. 

कोरची शहरातून तहसील कार्यालय पर्यंत बाईक रॅली सुद्धा काढण्यात आली होती. 

यावेळी विविध संघटनेचे पदाधिकारी, तथा सर्व आस्थापनातील कर्मचारी उपस्थित होते.

  Print


News - Gadchiroli
Related Photos