महत्वाच्या बातम्या

 मांगलीत अवैध दारूच्या वर्चस्वातून रक्तरंजित संघर्ष : दोन गटांमध्ये हाणामारी, चाकू आणि काठीने हल्ला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील मांगली गावात अवैध दारू विक्रीच्या वर्चस्वातून दोन गटांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी भद्रावती पोलीस स्टेशनमध्ये एकमेकांविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्याने गावातील अवैध धंद्यांवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मांगली गावातील धिरज मारोती वराठकर आणि आदित्य धनराज कांबळे हे दोघेही पूर्वी गावात अवैध दारू विक्री करीत होते. या व्यवसायातील स्पर्धा आणि वर्चस्वाच्या कारणावरून त्यांच्यात मागील काही महिन्यांपासून वाद सुरू होता. बुधवारी सकाळी याच जुन्या वैमनस्याचे रूपांतर उघड संघर्षात झाल्याचे समोर आले आहे.

धिरज वराठकर याने दिलेल्या तक्रारीनुसार, तो पिर्ती येथे जात असताना विवेकानंद माध्यमिक विद्यालयाजवळ एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेल्या आदित्य कांबळे, अक्षय मन्ने, सुरज मन्ने, पिट्टू मरस्कोले, विक्की लाडूकर, समीर बारेकर आणि अमृत बावने यांनी त्याला अडवले. यावेळी सर्वांनी शिवीगाळ करत मारहाण केली तसेच अक्षय मन्ने याने काठीने हात व पायावर वार करून जखमी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधितांनी मारहाणीचा व्हिडिओ काढून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

तर दुसऱ्या बाजूने आदित्य कांबळे याने देखील पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, तो सकाळी फिरण्यासाठी बाहेर गेला असताना धिरज वराठकर, सुरज परसुटकर, आकाश पाटील, सुरज वराठकर आणि शकर पाटील यांनी त्याला अडवून शिवीगाळ केली. धिरज वराठकर याने चाकूने चेहऱ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला असता बचाव करताना हाताला गंभीर दुखापत झाल्याचा दावा आदित्यने केला आहे. तसेच इतर आरोपींनी पकडून हाताबुक्यांनी मारहाण केली आणि पुन्हा गावात स्वस्त दारू विकल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या घटनेमुळे मांगली गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून दोन्ही गटांनी एकमेकांवर जीवघेणा हल्ला आणि धमकी दिल्याचे आरोप केले आहेत. अवैध दारू विक्रीच्या धंद्यातील वर्चस्व आणि आर्थिक व्यवहारातून हा संघर्ष उफाळल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

भद्रावती पोलिसांनी दोन्ही गटांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक वीरेंद्र केदारे करीत आहेत. घटनेनंतर गावात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos