युवतीच्या व्हाॅट्सऍपवर अश्लिल संदेश पाठविल्याप्रकरणी आंबेटोलाच्या पोलिस पाटलावर गुन्हा दाखल, आरोपी फरार


-  २२ नोव्हेंबरपासून आरोपीचा शोध सुरूच
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
युवतीच्या व्हाॅट्सऍपवर  अश्लिल संदेश पाठवून शरीरसुखाची मागणी करणाऱ्या गडचिरोली  तालुक्यातील आंबेटोला येथील पोलिस पाटलाविरूध्द गडचिरोली पोलिस ठाण्यात २२ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार आहे.
हरीचंद्र लहुजी खंडारे असे पोलिस पाटलाचे नाव असून त्याच्यावर कलम ३५४ अ आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार पिडीत युवती आपल्या कुटूंबीयांसमवेत आंबेटोला येथेच राहते. तिच्याकडे अँड्रॉइड मोबाईल असून ती व्हाॅट्सऍप वापरत होती. तिच्या कुटुंबीयांचा काही कामानिमित्त पोलिस पाटील खंडारे याच्यासोबत संपर्क येत असल्याने मोबाईल क्रमांक त्याच्याकडे होता. पिडीत युवती २० नोव्हेंबर रोजी शिवणी येथे गेली होती. यावेळी तिच्या व्हाॅट्सऍपवर  पोलिस पाटील हरीचंद्र खंडारे याचा संदेश आला. या संदेशात त्याने अत्यंत लज्जास्पद लिहिले होते तसेच शरीसुखाची मागणी केली होती. पिडीत युवतीने गावी परतल्यानंतर पोलिस पाटलाला याचा जाब विचारण्यासाठी घर गाठले. यावेळी पोलिस पाटलाचा १५ वर्षीय मुलगा घरी होता. मुलाने वडील बाहेर गेला असल्याचे सांगितले. यानंतर पोलिस पाटील खंडारे हा गावातच आढळून आला. यावेळी त्याला जाब विचारला असता त्याने उडवा - उडवीची उत्तरे दिली. यानंतर पिडीत युवतीने गडचिरोली पोलिस ठाणे गाठून २२ नोव्हेंबर रोजी तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपी फरार झाला आहे. यामुळे आरोपीस तत्काळ अटक करण्याची मागणी पिडीतेच्या कुटुंबीयांनी केली आहे. याबाबत गडचिरोलीचे ठाणेदार दीपरतन गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती दिली आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-12-14


Related Photos