केरळच्या मदतीसाठी संयुक्त अरब अमिरातीने ७०० कोटींची मदत जाहीर केलीच नाही !


- युएईचे राजदूत अहमद अलबन्ना यांचे स्पष्टीकरण 
वृत्तसंस्था /  नवी दिल्ली :
केरळमधील पूरग्रस्तांना  संयुक्त अरब अमिरातीने  ७०० कोटींची   मदत  जाहीर केलीच नाही, असे स्पष्टीकरण युएईचे राजदूत अहमद अलबन्ना यांनी दिले. केरळला मदत मिळेल, मात्र ७०० कोटींचा आकडा अधिकृत जाहीर झालेला नाही. युएईकडून किती मदत मिळेल याबाबत अद्याप ठरलेले नाही, असेही अलबन्ना यांनी स्पष्ट केले आहे. 
अबुधाबीचे राजा शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर संपर्क साधत केरळला ७०० कोटींची मदत देणार असल्याचे सांगितल्याचे वृत्त पसरले होते. त्यानंतर परदेशांतून मदतीचा ओघ सुरु झाला होता. यावर केंद्र सरकारने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या एका निर्णयाचा हवाला देऊन परदेशाची मदत नाकारली होती. यावर केरळ आणि अन्य नेत्यांकडून केंद्र सरकारवर टीका झाली होती. या पार्श्वभूमीवर हा खुलासा करण्यात आल्याने आता नवा वाद निर्माण झाला आहे.  तसेच भारत सरकारने परदेशातील मदत नाकारल्याबाबतही सरकारच्या अधिकाऱ्यांशी चर्चा सुरु आहे. भारतातील नियमांची पूर्ण कल्पना आहे, असेही त्यांनी सांगितले.  Print


News - World | Posted : 2018-08-24


Related Photos