रात्रीच्या अंधारात चोरीचा डाव : बल्लारपूर पोलिसांच्या धाडसाने तिघांचा मनसुबा फसला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत संशयास्पदरीत्या फिरून चोरीसारखा दखलपात्र गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरून बल्लारपूर पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले. ही कारवाई १४ सप्टेंबरच्या मध्यरात्री रेल्वे क्वॉर्टर परिसर आणि ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारत बांधकाम परिसरात करण्यात आली. तिन्ही संशयितांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. बल्लारपूर पोलीस ठाण्यातील पथक रात्री पेट्रोलिंग करीत होते. यावेळी रेल्वे क्वॉर्टर परिसरात एक व्यक्ती अंधाराचा फायदा घेत आपले अस्तित्व लपवून दबा धरून बसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेत त्याची चौकशी केली. त्याने आपले नाव रोशन राजू सिंगरु (वय २८), रा. धोपटाला, वार्ड क्रमांक १, जयभीम चौक, ता. राजुरा असे सांगितले. रात्रीच्या वेळी अंधारात लपून बसण्याचे कारण विचारले असता त्याने समाधानकारक उत्तर न देता उडवाउडवीची उत्तरे दिले. दरम्यान, याच पेट्रोलिंगदरम्यान ग्रामीण रुग्णालय, बल्लारपूर येथील नवीन इमारत बांधकाम परिसरात दोन व्यक्ती अंधारात दबा धरून बसल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांनी टॉर्चचा प्रकाश टाकताच दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना पकडून चौकशी केली.
त्यांची नावे अमर बाबूराव रामटेके ४० वर्ष व्यवसाय ऑटोचालक, रा. वैशाली चौक, बल्लारपूर आणि पप्पू उर्फ अजगर मोहर गायकवाड २९ वर्ष रा. रविंद्रनगर वॉर्ड, बल्लारपूर अशी समोर आली. रात्रीच्या वेळी बांधकाम परिसरात लपून बसण्याचे कारण विचारले असता दोघांनीही समाधानकारक उत्तर दिले नाही. पोलिसांनी तिन्ही संशयितांविरुद्ध घटनास्थळ पंचनामा करून महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ अन्वये कायदेशीर कारवाई केली.




Petrol Price




