महत्वाच्या बातम्या

 मुंबई, ठाणे, रायगड तापणार : पुढील तीन दिवसांसाठी उष्णतेचा यलो अलर्ट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / पुणे : राज्यातील आणि देशातील वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. गेल्या आठवडाभर राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाचा फटका बसला. तर अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असल्याने पारा घसरला होता. आता पुन्हा शनिवारपासून वातावरण तापायला सुरुवात होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी या ठिकाणी उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यातल्या तीन जिल्ह्यात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. २७ ते २९ एप्रिल या तीन दिवसात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये २७ आणि २८ एप्रिल रोजी तापमानात मोठी वाढ होऊ शकते. याआधी १५ आणि १६ एप्रिल रोजी मुंबईमध्ये अनेक ठिकानी तापमानामध्ये वाढ झाली होती. नवी मुंबईसह, उपनगरात पारा ४१ अंशावर गेला होता. आता पुन्हा एकदा मुंबई, ठाणे, रायगड या तीन जिल्ह्यांना हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.

मुंबई, ठाणे, रायगडमध्ये तापमानात वाढ होणार आहे. तर विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवस मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. आठवडाभर विदर्भ, मराठवाड्यात पावसाने हजेरी लावली आहे. आता सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड परभणी, हिंगोली या भागात पावसाची शक्यता आहे. पुणे, नगर, जालना, जळगाव, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. या भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे, तर काही भागात गारपीट होण्याचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.





  Print






News - Rajy




Related Photos