महत्वाच्या बातम्या

 पंचसूत्रीतून साधणार गोंदिया जिल्ह्याचा सर्वांगीण विकास : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गोंदिया : कुठल्याही जिल्ह्याचा विकास हा तेथील मूलभूत पायाभूत सुविधांच्या आधारावर होत असतो. गोंदिया जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्य, शिक्षण, सिंचन, रोजगार आणि कृषी या पाचही घटकांतील सर्व समस्या दूर करून जिल्ह्याला सर्वच बाबतीत सक्षम करणार, याच पाच गोष्टीला सर्वात प्रथम आपले प्राधान्य असणार असून, ही जिल्ह्याच्या विकासाची पंचसूत्री असणार असल्याचे राज्याचे वनमंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी (दि. १०) जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

पत्रकार परिषदेला सुनील मेंढे, अशोक मेंढे, आ. विजय रहांगडाले, विनोद अग्रवाल, परिणय फुके व अधिकारी उपस्थित होते. ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले गोंदिया जिल्ह्याचा नियोजन आराखडा तयार करण्यात आला आहे. हा आराखडा सर्वंकष तयार व्हावा, यातून जिल्ह्याचे भविष्याचे चित्र स्पष्ट व्हावे अशा सूचना सर्व अधिकाऱ्यांना केल्या आहेत. यात सर्वच पक्षाच्या आमदारांचे प्रश्न आणि त्यांचे मत ग्राह्य धरून ते तयार केले जाईल. १४ ऑक्टोबरपर्यंत हा सर्वंकष आराखडा तयार केला जाणार असून, त्यानंतर जिल्ह्याच्या विकासाला सुरुवात केली जाईल. प्रशासन हे लोकाभिमुख करण्यावर भर असेल. सर्वसामान्यांना त्यांच्या समस्या व प्रश्न मांडण्यासाठी पायपीट करावी लागू नये यासाठी एक विशेष ॲप कार्यक्रम तयार करून मोबाइलवर या समस्यांचे निराकरण केले जाईल, असे सांगितले.

धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस मिळावा ही सरकारचीसुद्धा भूमिका आहे. याचा लाभ शेतकऱ्यालाच मिळावा, यातील गैरव्यवहार दूर व्हावा यासाठी उपाययोजना केल्या जात आहे. त्यासाठी उपसमिती गठित करण्यात आली असून, धान उत्पादक शेतकऱ्यांना निश्चित बोनस मिळेल अशी ग्वाही ना. मुनगंटीवार यांनी दिली.

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना ३० दिवसांच्या आत नुकसानभरपाई् दिली जावी, असा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच यापेक्षा अधिक विलंब झाल्यास संबंधित व्यक्तीच्या कुटुंबीयांना व्याजासह रक्कम देण्याची तरतूद केली असल्याचे ना. मुनगंटीवार यांनी सांगितले.

गोंदिया शहरालगत वाहणाऱ्या पांगोली नदीचे पुनरुज्जीवन करण्याचा मुद्दा खा. सुनील मेंढे यांनी नियोजन समितीच्या बैठकीत उपस्थित केला. त्याला मंजुरी दिली असून, पांगोली नदीचे पुनरुज्जीवन केले जाईल. यासाठी निधीची कमतरता पडून देणार नाही, अशी ग्वाही ना. मुनगंटीवार यांनी दिली.

भंडारा, गोंदिया, गडचिरोलीमध्ये धुमाकूळ घातलेल्या सिटी-१ या नरभक्षी वाघाला जेरबंद करण्याचे आदेश वनविभागाला दिले आहे. तसेच जंगलावर असणारे लोकांचे अवलंब कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी तेंदुपत्ता संकलन करणाऱ्याची बोनसची रक्कम ७२ कोटी रुपयांनी वाढविली असल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.





  Print






News - Gondia




Related Photos