वरोऱ्यातील कुख्यात गुंड देवा नौकरकर याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी चंद्रपूर पोलिसांनी सराईत गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. या कारवाईअंतर्गत वरोरा येथील पोलीस अभिलेखावरील कुख्यात गुंड देवा उर्फ देविदास भैयाजी नौकरकर रा. मित्र चौक, गांधी वॉर्ड, वरोरा याच्यावर महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना प्रतिबंध करण्याबाबतच्या अधिनियमांतर्गत (एमपीडीए) स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.
नौकरकर याच्याविरुद्ध वरोरा पोलीस ठाण्यात खून, अवैध दारू, शस्त्र अधिनियम तसेच महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये एकूण १८ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्याच्या गुन्हेगारी कारवायांमध्ये बदल न झाल्याने त्याच्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याचे पोलिसांच्या कारवाईत नमूद करण्यात आले आहे.
आगामी सणासुदीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध एमपीडीएअंतर्गत स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार करून जिल्हादंडाधिकारी वसुमना पंत यांच्याकडे सादर केला होता. प्रस्तावाची दखल घेत जिल्हादंडाधिकाऱ्यांनी २४ सप्टेंबर २०२६ रोजी देवा उर्फ देविदास नौकरकर याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचा आदेश जारी केला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा संतोष बाकल, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, वरोरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार ओमप्रकाश सोनटक्के तसेच सहायक पोलीस निरीक्षक योगेश खरसान यांनी कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.




Petrol Price




