गडचिरोली जिलानी बाबा काळाच्या पडद्याआड!

- आरमोरी मार्गावर पोलिसांचा चोख बंदोबस्त; आज सायंकाळी ६ नंतर वाहतूक बंद
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली परिसराचे श्रद्धास्थान आणि आयुष्यभर सर्वधर्मसमभावाचा संदेश देणारे प्रसिद्ध आध्यात्मिक व्यक्तिमत्त्व हजरत जिलानी सरकार (जिलानी बाबा) यांचे २७ सप्टेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच गडचिरोलीसह संपूर्ण विदर्भ आणि सीमावर्ती भागातील लाखो अनुयायांवर तीव्र शोककळा पसरली आहे.
हिंदू-मुस्लिम समाजाचे श्रद्धास्थान -
जिलानी बाबा हे केवळ एका विशिष्ट समाजापुरते मर्यादित नसून हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजांचे मोठे श्रद्धास्थान होते. सन १९९६ पासून त्यांनी गडचिरोली येथे वास्तव्य करून लाखो भक्तांना आध्यात्मिक आधार दिला. आपल्या जीवनकार्यातून त्यांनी नेहमी सर्वधर्मसमभावाचा मार्ग दाखवत समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्याचे मोलाचे कार्य केले. त्यांच्या निधनाने अध्यात्माच्या क्षेत्रातील एक मोठा मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
आरमोरी मार्गावरील वाहतूक सायंकाळी ६ नंतर बंद -
बाबांच्या अंतिम दर्शनासाठी आणि अंत्यविधीसाठी शहरात भाविकांची प्रचंड गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जिलानी बाबांचा अंत्यविधी आरमोरी रोडवरील पाल नदी परिसरात पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा उपाय आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आज सायंकाळी ६:०० वाजेनंतर आरमोरी रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
प्रशासनाचे सहकार्याचे आवाहन -
नागरिकांनी व भाविकांनी वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करावे आणि पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच गर्दीची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी अत्यंत महत्त्वाचे काम नसल्यास विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, अशी सूचनाही जारी करण्यात आली आहे.




Petrol Price




