महत्वाच्या बातम्या

  देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा येथील रेती तस्करांनी ४० लाखांच्यावर शासनाला लावला चुना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

शहर प्रतिनिधी / देसाईगंज : तालुक्यातील कोंढाळा मेंढा वैनगंगा नदी घाटातून दररोज नऊ ते दहा ट्रॅक्टर सोबतच एक ते दोन टिप्पर घाटात टाकून अवैधरित्या रेतीचा उपसा केला जात आहे. रेती तस्करांनी जवळपास अंदाजे ४० ते ५० लाख रुपयांची रेती चोरी करून मोठ्या प्रमाणावर शासनास चुना लावला आहे. अशातच रेती तस्करांनी रात्रंदिवस गावातून व गावाच्या बाहेरून ट्रॅक्टर व इतर साधनांद्वारे धुमाकूळ घातला असल्याने गावातील नागरिकांची झोप उडवून टाकली आहे. झोप तर उडवली मात्र, देसाईगंज महसूल विभाग घाटावर खड्डे मारून गाढ झोपेत कसे? याचे नवलच वाटते आहे. कोंढाळा साज्यामध्ये महिला तलाठी कर्मचारी असल्याने रेती तस्करांची हल्ली चांदीच-चांदी दिसून येत आहे. पूर्वी रेती तस्कर सुट्टीचे दिवस निवडायचे मात्र आता सुट्टी गेली खड्डयात सर्वच दिवस शासकीय सुट्टीचे मानून रेती सुतवा रे सुतवा! असा धिंगाणा घातला आहे. तलाठी वा देसाईगंज महसूल विभागातर्फे मेंढा रेती घाटावर खड्डे मारले जात आहेत. मात्र तुम्ही कितीही खड्डे मारा.! आम्ही ते बुजवणारच व रेती चोरणारच अशी सर्व रेती तस्करांनी प्रतिज्ञा घेतली असल्याने महसूल विभागाच्या नाकीनऊ आल्याचे वाटते. लाखोंच्यावर रेती चोरीला जाऊनही एकही ट्रॅक्टर वा इतर साधन वैनगंगा मेंढा रेती घाटातून हल्ली पकडण्यात महसूल विभागाला यश आले नसल्याचे दिसून येत आहे.

ज्याप्रमाणे घरातील घुस एखादी जागा पोखरून काढते तशी कोंढाळा वैनगंगा मेंढा नदिघाटाची रेती पोखरून काढण्यात रेती तस्करांनी यश संपादन केले आहे. खालच्या स्तरापासून १० फूट उंची पर्यंत रेती पोखरली गेली आहे ट्रॅक्टर वा टिप्पर रेती जवळ नेला की भरण्याची आवश्यकताच नाही आपोआप रेती घसरण्यास सुरुवात होऊन थोडा हातभार लावावा लागतो रेती तस्करांनी थंडीच्या बचावासाठी रेती घाटातच शेकोटी पेटवून रेती चोरीची रात्र पिंजून काढण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला की काय? असे रेती घाटातील प्रकारावरून दिसून येते.

रात्रोच्या सुमारास रेतीचे ऑर्डर मिळत नसल्याने रात्रो साठा करून दिवसाढवळ्या खुलेआम राजरोसपणे गावातून व कोंढाळा देसाईगंज मुख्य हायवे मार्गाने तेही सर्वांच्या नजरेसमोर ट्रॅक्टर ट्रॉली वरती निळ्या रंगाची जाळी लावून बेधडकपणे रेती तस्करी केली जात असल्याने सर्वांचे खिसे गरम झाले की काय? असे सर्वसामान्य नागरिकांच्या मनात घर करून सोडत आहे. गावातील काही नागरिकांना रेती घाट लिलाव झाल्याचे आनंद द्विगुणीत झाले आहे. खरी परिस्थिती लक्षात घेता घाट लिलाव न होता रेती तस्करांनी कोंढाळा वैनगंगा नदी मेंढा रेती घाट आपसात वाटून घेतले आहे.

रेती घाटांवर केवळ खड्डे मारून केवळ बोलबाला करण्यात काहीही अर्थ नाही अवैध रेतीवर आळा घालणे गरजेचे आहे खड्डे मारणे म्हणजे अवैध रेतीवर आळा घालणे नव्हे तर ट्रॅक्टर वा इतर साधन पकडून कारवाई करणे आवश्यक आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos