मुरगांव येथील लाचखोर सरपंच अडकला एसीबीच्या जाळ्यात
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : धानोरा तालुक्यातील मुरगांव येथील सरपंच मारोती रावजी गेडाम (५० वर्ष) यांना तक्रारदाराच्या सीसी रोडच्या बांधकामाच्या चेकवर स्वाक्षरी करुन देण्याच्या कामाकरीता ७५ हजार रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपात ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने शुक्रवारी केली.
प्राप्त माहितीनुसार तक्रारदार यांनी ग्रामपंचायत मुरगांव अंतर्गत कोकडकसा समाजमंदीर ते साधु पदा यांच्या घरापर्यतचे सीसी रोडचे बांधकाम पूर्ण केले होते. सदर सीसी रोडच्या बांधकामाच्या चेकवर स्वाक्षरी करुन देण्याच्या कामाकरीता मुरगांव ग्रामपंचायतचे सरंपच मारोती गेडाम यांनी ९० हजार रुपये लाच रक्कमेची पंचसाक्षीदारासमक्ष मागणी केली. मात्र तक्रारदाराला लाचरक्कम देण्याची मुळीच इच्छा नसल्याने एसीबीकडे तक्रार केली. तडजोडीअंती सरपंच ७५ हजार रुपये लाच रक्कम घेण्यास तयार झाला. तक्रारीची शहानिशा करून एसीबी पथकाने ती रक्कम स्थानिक इंदिरा गांधी चौकात रस्त्याच्या बाजूला स्विकारतांना लाचखोर सरपंचाला रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले. व पोलीस स्टेशन गडचिरोली येथे गुन्हा नोंद करण्यात आला.
ही कारवाई पोलीस उपअधिक्षक सुरेंद्र गरड यांचे पर्यवेक्षणात पो.नि. शिवाजी राठोड, सफौ प्रमोद ढोरे, पोहवा नथ्थु धोटे, नापोशि राजु पदमगिरीवार, श्रीनिवास संगोजी, स्वप्निल बांबोळे, किशोर जौंजारकर, पो.शि. संदीप घोरमोडे, किशोर ठाकुर, संदिप उडाण, म.पो.शि विद्या म्हशाखेत्री, जोत्सना वसाके, चापोहवा तुळशीराम नवघरे सर्व ला. प्र. विभाग गडचिरोली यांनी केली.
News - Gadchiroli