राष्ट्रीय ज्युनिअर एथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत नयन सरडेला सुवर्णपदक
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : भारतीय एथलेटिक्स महासंघाच्या अधिपत्त्याखाली तसेच आसाम राज्य एथलेटिक्स संघटनेच्या सहकार्याने आसामची राजधानी गुवाहाटी येथे नोव्हेंबर २०२२ मध्ये संपन्न झालेल्या ३७ व्या राष्ट्रीय ज्युनिअर एथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या क्रीडा प्रबोधिनी नागपूरच्या खेळाडू नयन प्रदिप सरडे याने प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक पटकावले. नागपूरच्या क्रीडाविश्वात गौरवाचा मानाचा तुरा रोवला.
त्याने अठरा वर्ष आतील मुलांच्या गटात ११० मिटर हर्डल्स स्पर्धेत १४.३७ सेंकदाची वेळ नोंदविली.
३३ व्या पश्चिम विभागीय एथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतून नयनची निवड या स्पर्धेकरिता झाली होती. नयन हा मागील तीन वर्षांपासून क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथे सुरु असलेल्या क्रीडा प्रबोधिनी, नागपूरचा खेळाडू आहे. ते दररोज सकाळ-सांयकाळ क्रीडा संकुल, मानकापुर येथे क्रीडा प्रबोधिनीचे प्राचार्य शेखर पाटील, मानकापूर येथील क्रीडा मार्गदर्शीका अरुणा गंधे व क्रीडा प्रबोधिनीचा खेळाडू शमशेर खान यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे.
स्पर्धेतील नयनच्या कामगिरीवर क्रीडा व युवक सेवा संचालनाचे उपसंचालक तथा क्रीडा प्रबोधिनीचे प्राचार्य शेखर पाटील यांनी पुष्पगुच्छ देवून सत्कार केला व पुढील स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा देवून कौतुक केले. जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांनीही आनंद व्यक्त केला.
News - Nagpur