शिक्षक बदली घोटाळ्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे माजी सभापती विश्वास भोवते यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  गडचिरोली :
२०१३ मध्ये झालेल्या बहुचर्चित शिक्षक बदली घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेले जिल्हा परिषदेचे माजी सभापती विश्वास भोवते यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आज  ९ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवल्यानंतर त्यांना न्यायालयात हजार करण्यात  आले होते. 
 जिल्हा परिषदेने २०१३ मध्ये २२० प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या केल्या होत्या. याप्रकरणाची वाच्यता झाल्यानंतर २०१५ मध्ये तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांनी पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. त्यानंतर ऑगस्ट २०१५ पासून ७३ शिक्षकांचे बयाण नोंदविण्याची प्रक्रिया सुरु झाली. परंतु सर्वांचे बयाण नोंदविल्यानंतर पुन्हा हे प्रकरण थंडबस्त्यात ठेवण्यात आले होते. पुढे शिक्षक आमदार नागो गाणार व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेच्या पाठपुराव्यानंतर शिक्षण विभागातील कनिष्ठ लिपिक रुपेश शेडमाके, विजेंद्र उर्फ विजय सिंग, नचिकेत शिवणकर, प्रमोद चहारे, सुनील लोखंडे व विनोद अल्लेवार यांना अटक केली होती. नंतर त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली. 
याच प्रकरणात नाव आल्यानंतर जिल्हा परिषदेचे तत्कालिन समाजकल्याण सभापती विश्वास भोवते यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी १० ऑक्टोबर २०१६ रोजी न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर भोवते यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.  १८ सप्टेंबर २०१८ रोजी गडचिरोली पोलिसांनी त्यांना अटक केली.  न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र, भोवते यांनी अस्वस्थ वाटत असल्याचे कारण पुढे केल्याने  त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. पुढे १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर शनिवारी ६ ऑक्टोबर रोजी    न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना ९ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते . पोलीस कोठडीनंतर आज परत न्यायालयात हजार केल्यानंतर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. यामुळे त्यांची चंद्रपूर येथील कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. याप्रकरणी आणखी काही तत्कालीन  पदाधिकारी व अधिकाऱ्यांचीही चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-10-09


Related Photos