महत्वाच्या बातम्या

 गर्भाला रक्त देऊन वाचविले गर्भाचे प्राण


- भंडारा जिल्ह्यातील पहिला प्रयोग यशस्वी

प्रतिनिधी / भंडारा : लाखनी तालुक्यातील राजेगाव - मोरगाव येथील ३३ आठवड्याची निगेटिव्ह रक्तगट असलेली गरोदर स्त्री गर्भाच्या एरिथ्रोब्लास्टोसिस फिटालीसया आजाराने ग्रस्त होती.
या आजारामध्ये गर्भाचे हिमोग्लोबिन कमी होत असल्यामुळे गर्भाला रक्त देणे गरजेचे असते. सोनोग्राफी कलर डॉपलर तपासणीद्वारे गर्भाचे हिमोग्लोबिन कमी होऊन गर्भात पाणी तयार होण्याची क्रिया सुरु होत असल्याचे आढळले.
कमी आठवड्याचे गरोदरपण असल्यामुळे, लवकर प्रसूती टाळण्यासाठी व प्रसूती अपेक्षित कालावधीपर्यंत ढकलण्यासाठी गर्भाला रक्त देणे गरजेचे होते. गर्भाला रक्त देण्याची ही जटिल प्रक्रिया सिद्धिविनायक हॉस्पिटल लाखनी येथील फीटल मेडिसिन तज्ञ डॉ. मीरा मनोज आगलावे व त्यांच्या सहकार्यांनी ग्रामीण भागात यशस्वी करून दाखवली.
ह्या आजारामध्ये निगेटिव्ह रक्तगट असलेल्या गरोदर स्त्रीला मागील प्रसूती, गर्भपात ह्या मध्ये अँटी-डी इन्जेकशन न मिळाल्यास अथवा गर्भाशयातील अंतर्गत रक्तस्त्रावामुळे मातेमध्ये गर्भाच्या लाल रक्तपेशी नष्ट करण्याऱ्या अँटीबॉडीस तयार होतात. ह्या अँटीबॉडीस पुढील गरोदरपणात गर्भाकडे जाऊन गर्भाच्या लाल रक्तपेशी नष्ट करतात. त्यामुळे गर्भाचे हिमोग्लोबिन कमी होते. गर्भाला सुजण येऊन त्यामध्ये पाणी तयार होते व पोटामध्ये बाळ दगावते.
निगेटिव्ह रक्तगट असलेल्या गरोदर स्त्रियांनी इनडायरेक्ट कूम्ब्स टेस्ट करून सातव्या महिन्यात अँटी-डी इन्जेकशन मिळाल्याची खात्री करून घ्यावी, अशी माहिती फीटल मेडिसिन तज्ञ डॉ. मीरा आगलावे यांनी दिली. याआधी अनेक वेळा डॉ. मीरा आगलावे यांनी गर्भाच्या जनुकीय चाचणीद्वारे सिकल सेल, थॅलॅसीमिया ग्रस्त, गर्भाला डाउन सिंड्रोमचा धोका असलेल्या रुग्णांना दिलासा दिला आहे.
वरील शस्त्रक्रियेसाठी डॉ. मनोज बी. आगलावे, भूलतज्ञ डॉ. दिपक, बालरोग तज्ञ डॉ. छगन राखाडे, डॉ. गौरी व हॉस्पिटल मधील कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.





  Print






News - Bhandara




Related Photos