भरधाव ट्रकने चिमुकल्या भावंडांना चिरडले : दीड वर्षांच्या विधानचा दुर्दैवी मृत्यू

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : वडिलांसोबत मोटारसायकलवरून बाजाराकडे निघालेल्या दोन चिमुकल्या भावंडांवर काळाने घाला घातला. मटन मार्केटसमोर समोरून आलेल्या ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याने वडील आणि दोन्ही मुले मोटारसायकलसह रस्त्यावर कोसळले. ट्रकसोबत काही अंतर फरफटत गेल्याने दीड वर्षांच्या विधान या चिमुकल्याचा मृत्यू झाला, तर तीन वर्षांचा मोठा भाऊ आणि वडील जखमी झाले. ही हृदयद्रावक घटना १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास भद्रावती येथे घडली.
रणदिर जगदीश पाल २८ वर्षे, रा. हनुमान नगर, पांडे वार्ड, भद्रावती हे गुपचुपचा ठेला चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ते आपल्या दोन्ही मुलांना घेऊन होंडा एचएफ डिलक्स मोटारसायकल क्रं एमएच ३४ सीएम८४४८ ने बाजाराकडे जात होते. मटन मार्केटसमोर समोरून ट्रक क्रं एमएच ३६ एफ १२६८ आला. रणदिर पाल यांनी मोटारसायकल थांबवून ट्रकचालकाला वाहन थांबविण्याचा इशारा केला. मात्र, चालकाने वाहन न थांबवता पुढे नेल्याने ट्रकचा धक्का मोटारसायकलच्या हँडलला लागला.
धडकेनंतर मोटारसायकल ट्रकच्या बाजूला कोसळली. रणदिर पाल, त्यांची दोन्ही मुले आणि मोटारसायकल ट्रकसोबत काही अंतर जमिनीवर फरफटत गेले. या भीषण अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत ट्रक थांबवून जखमींना ट्रकपासून वेगळे केले. अपघातात रणदिर पाल, त्यांचा तीन वर्षांचा मुलगा बॉबी आणि दीड वर्षांचा मुलगा विधान गंभीर जखमी झाले.
नागरिकांनी तातडीने तिघांनाही भद्रावती ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर दीड वर्षांचा विधान मृत झाल्याचे सांगितले. डोळ्यांसमोर झालेल्या अपघातात चिमुकल्या मुलाचा जीव गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या प्रकरणी रणदिर पाल यांनी भद्रावती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून भद्रावती पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू आहे.




Petrol Price




