१२ तासांच्या वीजपुरवठ्यामुळे धान पिके धोक्यात : पावसाची दडी, शेतकरी हवालदिल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्यात धान पिके सध्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यात असून पिकांना पुरेशा पाण्याची नितांत गरज आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यातच कृषी पंपांसाठी केवळ १२ तास वीजपुरवठा होत असल्याने शेतातील पिकांना आवश्यक तेवढे पाणी देणे शेतकऱ्यांना कठीण झाले आहे. परिणामी, हातातोंडाशी आलेले धान पीक पाण्याअभावी करपण्याच्या मार्गावर असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
जिल्ह्यात नदी, नाले, तलाव तसेच अन्य जलस्रोतांची कमतरता नाही. अनेक भागांमध्ये शेतीसाठी पाण्याची उपलब्धता असतानाही त्या पाण्याचा उपसा करण्यासाठी विजेची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे पाणी असूनही ते शेतापर्यंत पोहोचविणे शेतकऱ्यांसाठी आव्हान ठरत आहे. दिवसभरात जेमतेम एकच बांधी भरते पूर्वीच्या वीजपुरवठ्याच्या कालावधीचा विचार करून अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात ३ एचपी क्षमतेचे कृषी पंप बसविले आहेत. मात्र, सध्या केवळ १२ तास वीज उपलब्ध होत असल्याने या पंपांच्या माध्यमातून अपेक्षित प्रमाणात पाण्याचा उपसा करता येत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.
महावितरणकडून कृषी पंपांसाठी सकाळी ६ ते सायंकाळी ६ या कालावधीत वीजपुरवठा केला जात असल्याने दिवसभर पाणी उपसूनही जेमतेम एका बांधीत पाणी पोहोचविणे शक्य होत आहे. एका बांधीत पाणी भरल्यानंतर वीजपुरवठा बंद होतो. रात्रीच्या वेळेत त्या बांधीत साचलेले पाणी मोठ्या प्रमाणात जमिनीत जिरून जाते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच बांधीत पाणी देण्याची वेळ येते. परिणामी, पुढील बांधीतील धान पीक पाण्याअभावी कोरडे राहते.
पावसाने दडी मारल्याने दुहेरी संकट यंदाच्या हंगामात धान पिकांची वाढ चांगली होण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला आहे. मात्र, सध्या पावसाची आवश्यकता असताना पावसाने दडी मारल्याने पिकांना सिंचनाची गरज वाढली आहे. अशा परिस्थितीत वीजपुरवठ्याचा कालावधी मर्यादित असल्याने शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट निर्माण झाले आहे. धान पिकाला वेळेवर पाणी मिळाले नाही तर उत्पादनावर त्याचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृषी पंपांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या वीजपुरवठ्याचा कालावधी वाढविण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
हत्तींच्या उपद्रवामुळे सोलार पंपही अडचणीत शासनाने नवीन वीज जोडणी देण्याऐवजी ‘मागेल त्याला सोलार पंप’ योजनेला प्रोत्साहन दिले आहे. मात्र, गडचिरोली जिल्ह्यात गेल्या काही काळापासून वाढलेल्या जंगली हत्तींच्या उपद्रवामुळे सोलार पंप यंत्रणाही सुरक्षित राहिलेली नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
हत्तींकडून सोलार पंपांच्या प्लेट्स तोडणे, यंत्रणा उखडून फेकणे तसेच संपूर्ण सेटअपचे नुकसान करण्याच्या घटना घडत असल्याने लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे हत्तींच्या अधिवासाच्या परिसरातील शेतकऱ्यांसाठी सोलार पंप हा कायमस्वरूपी आणि सुरक्षित पर्याय ठरत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
वीजपुरवठ्याचा कालावधी वाढविण्याची मागणी कृषी पंपांना सध्या शासनाने निश्चित केलेल्या नियमानुसार १२ तास वीजपुरवठा केला जात आहे. शासनाकडून महावितरणला अतिरिक्त वीजपुरवठ्याबाबत निर्देश मिळाल्यास कृषी पंपांसाठी वीजपुरवठ्याचा कालावधी वाढविणे शक्य होऊ शकते. मात्र, याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवरून घेणे आवश्यक असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, पावसाने दडी मारलेली असताना धान पिके वाचविण्यासाठी सिंचनाची तातडीची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून कृषी पंपांना अधिक काळ वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, तसेच हत्तींच्या उपद्रवग्रस्त भागातील सोलार पंपांचे संरक्षण व नुकसानभरपाईबाबत ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.




Petrol Price




