सलग दुसऱ्या वर्षी इटियाडोह धरण ओव्हरफ्लो


- नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा; सांडव्यावरून १६९ क्यूसेक पाण्याचा विसर्ग
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / गोंदिया : तालुक्यासह गोंदिया जिल्ह्यातील प्रमुख सिंचन प्रकल्प म्हणून ओळखले जाणारे इटियाडोह धरण सलग दुसऱ्या वर्षी ओव्हरफ्लो झाले आहे. शनिवारी २६ सकाळी ६ वाजता धरणाने पूर्ण संचय पातळी गाठल्यानंतर सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू झाला. सध्या सांडव्यावरून सुमारे १६९ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून, विसर्गाचे प्रमाण कमी-जास्त होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे इटियाडोह जलाशयातील संचित पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत गेली. अखेर धरणाने आपली पूर्ण संचय क्षमता गाठत शनिवारी सकाळी ओव्हरफ्लो होण्यास सुरुवात केली. धरण ओव्हरफ्लो झाल्याने परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
तीन जिल्ह्यांतील शेतीसाठी महत्त्वाचा प्रकल्प -
इटियाडोह प्रकल्प हा अर्जुनी-मोरगाव तालुक्याचे वैभव मानला जातो. गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यातील हजारो एकर शेतीला या प्रकल्पाच्या माध्यमातून सिंचनाची सुविधा उपलब्ध होते. रब्बी हंगामातील पिकांसाठी तसेच विविध भागांतील पिण्याच्या पाण्याच्या गरजेसाठीही हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. सन १९७२ मध्ये इटियाडोह धरणाची निर्मिती करण्यात आली. सुमारे ३८१.५८७ एमएमक्यू सिंचन क्षमतेचा हा जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्प असून, प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात पावसाची आवश्यकता असते. यंदा झालेल्या दमदार पावसामुळे जलाशयातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ झाली आणि अखेर धरण ओव्हरफ्लो झाले.
नदीपात्रात जाणे टाळण्याचे आवाहन -
धरण ओव्हरफ्लो झाल्याने नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता लक्षात घेता संबंधित विभागाने नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नदीपात्रातून आवागमन करणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
नागरिकांनी नदीपात्र ओलांडू नये, शेतीची अवजारे नदीपात्रात ठेवू नयेत तसेच जनावरांना नदीपात्रात किंवा नदीपात्रातून जाण्यास देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. जलाशयाच्या सांडव्यावरून होणारा विसर्ग परिस्थितीनुसार कमी-जास्त होऊ शकतो. त्यामुळे नदीपात्राच्या आसपास जाणे शक्यतो टाळावे, असे इटियाडोह प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता समीर बनसोडे आणि पूर नियंत्रण कक्ष शाखा, गोठणगावचे शाखा अभियंता केतन गिरेपुंजे यांनी कळविले आहे.
मागील वर्षीही ऑगस्टमध्ये झाले होते ओव्हरफ्लो -
मागील वर्षी ऑगस्ट महिन्यातही इटियाडोह प्रकल्प ओव्हरफ्लो झाला होता. त्यानंतर काही काळ पावसाने दडी मारल्याने जलसाठ्यात वाढ मंदावली होती. मात्र, सप्टेंबरच्या शेवटच्या टप्प्यात झालेल्या दमदार पावसामुळे धरणातील जलसाठा सुमारे ९७ टक्क्यांवर पोहोचला होता. त्यामुळे धरण लवकरच ओव्हरफ्लो होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. यंदाही गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जलाशयातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आणि शनिवारी सकाळी सहा वाजता अखेर इटियाडोह धरण ओव्हरफ्लो झाले. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने आगामी रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
जलपूजन साध्या पद्धतीने -
धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर होणारे जलपूजन यंदा अत्यंत साध्या पद्धतीने करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान, धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.




Petrol Price




