प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा गडचिरोली जिल्ह्यातील १ लक्ष ४८ हजार ३३६ कुटुंबांना लाभ होणार : पालकमंत्री ना. आत्राम


- पालकमंत्री ना. आत्राम यांच्याहस्ते आयुष्यमान भारत योजनेचे लोकार्पण 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
"आयुष्यमान भारत" अंतर्गत प्रधानमंत्री जण आरोग्य योजनेचा  लोकार्पण सोहळा आदिवासी विकास, वने राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे  पालकमंत्री ना.  राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते काल  २३ सप्टेंबर   रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथील नियोजन सभागृह येथे पार पडला. 
पालकमंत्री म्हणाले, केंद्र शासनाच्या 'आयुष्यमान भारत' कार्यक्रमा अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राबविण्यात येत आहे.   प्रधानमंत्र्यांची ही अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे. या योजने अंतर्गत सामाजिक, आर्थिक व जातीय जनगणनेमधील देशातील ५० कोटी,  महाराष्ट्रातील ८४ लक्ष तर गडचिरोली जिल्ह्यातील १ लक्ष ४८ हजार ३३६ कुटुंबांना लाभ होणार आहे. प्रति कुटुंब प्रति वर्ष ५ लाख रुपयांचे विमा संरक्षण या योजनेच्या माध्यमातून गरीब व गरजू कुटुंबांना मिळणार आहे. १३४९ सर्जिकल व मेडिकल उपचारांच्या माध्यमातुन मान्यताप्राप्त खाजगी व शासकीय रुग्णालया मार्फत बायपास, मोतीबिंदू, हृदयरोग, कर्करोग यावरील सर्वतोपरी शस्त्रक्रिया तसेच इतर विविध रोगांवर औषधोपचार या योजनेच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत. योजनेच्या संदर्भातील अशी विस्तृत माहिती पालकमंत्र्यांनी लाभार्थ्यांना दिली.
ते पुढे म्हणाले, केंद्र व राज्य शासनामार्फत अश्या प्रकारच्या विविध योजना, विविध स्तरांवर, विविध घटकांसाठी राबविण्यात येत आहे. एकूण सामाजिक संरचनेचा स्तर  उंचावून त्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी अश्या प्रकारच्या योजनांची मांडणी केंद्रिय स्तरातून करण्यात येत आहे. तेव्हा या सर्व योजनांचा लाभ त्यात निहित नियमांनुसार त्याच्या योग्य लाभार्थी पर्यंत पोहचविण्याचे काम सर्वांनी मिळून करायचे आहे. त्याचप्रमाणे लाभार्थ्यांनीही योजनांचा योग्य तो लाभ घेऊन स्वतःला समृद्ध करायचे आहे. असे प्रतिपादन मंत्रीमहोदयांनी यावेळी केले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता भांडेकर, नगर परिषद अध्यक्षा योगिता पिपरे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विजय राठोड, प्रकल्प अधिकारी  सचिन ओम्बासे, जिल्हा शल्य चिकित्सक अनिल रुडे, जिल्हा आरोग्य अधिकारी शशिकांत शंभरकर आदी मान्यवरांसोबत मोठ्या प्रमाणात लाभार्थी उपस्थित होते.

   Print


News - Gadchiroli | Posted : 0000-00-00


Related Photos