महत्वाच्या बातम्या

 लोकवर्गणीतून शाळेचा कायापालट : जिल्हाधिकारी सावन कुमार भारावले


- सोमनाळा बूज गावाला मॉडेल गाव बनविण्यासाठी प्रयत्न; शाळेला स्मार्ट क्लासरूम देण्याची घोषणा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, सोमनाळा बूज येथे आज वाचनालय लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. गावकऱ्यांच्या लोकवर्गणीतून आणि सामूहिक सहभागातून शाळेत करण्यात आलेली विविध विकासकामे, शैक्षणिक उपक्रम आणि विद्यार्थ्यांसाठी निर्माण केलेल्या सुविधांची पाहणी करताना भंडारा जिल्हाधिकारी सावन कुमार (IAS) यांनी शाळेच्या कामाचे कौतुक केले. ग्रामीण भागातील एका छोट्याशा गावाने लोकसहभागातून उभा केलेला हा शैक्षणिक विकासाचा आदर्श पाहून जिल्हाधिकारी भारावून गेले.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी, लोकसहभाग आणि लोकवर्गणीच्या माध्यमातून शाळेचा केलेला कायापालट निश्चितच प्रेरणादायी आहे. अशाच पद्धतीने जिल्ह्यातील इतर गावांनीही पुढाकार घ्यावा, अशी भावना व्यक्त केली. तसेच सोमनाळा बूज गावाला मॉडेल गाव म्हणून विकसित करण्यासाठी प्रयत्न करण्याचा शब्द त्यांनी ग्रामस्थांना दिला.

शाळा व गावाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या बाबींची माहिती घेऊन गरजेनुसार शक्य ती मदत व विकासकामे पूर्ण करण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी आश्वस्त केले. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना आधुनिक व तंत्रज्ञानाधारित शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, सोमनाळा बूज येथे स्मार्ट क्लासरूम उपलब्ध करून देण्याची घोषणा जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी यावेळी केली. या घोषणेमुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

लोकवर्गणीतून उभा राहिला विकासाचा आदर्श -
सोमनाळा बूज येथील शाळेच्या विकासासाठी गावकऱ्यांसह विविध क्षेत्रातील दात्यांनी लोकवर्गणीच्या माध्यमातून योगदान दिले. या निधीतून शाळेचा परिसर स्वच्छ व सुंदर करण्यासोबतच विविध शैक्षणिक सुविधा, वाचनालय, डिजिटल शिक्षणासाठी आवश्यक वातावरण, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपक्रम तसेच शाळेच्या भौतिक सुविधांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.

शिक्षण हेच खरे धन या विचाराला केंद्रस्थानी ठेवून शाळेचा विकास करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ग्रामस्थ, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती आणि शिक्षणप्रेमी नागरिकांच्या एकत्रित प्रयत्नातून ग्रामीण शाळेचे रूप पालटू शकते, हे सोमनाळा बूज शाळेने दाखवून दिले आहे.

वाचनालय विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचे नवे दालन -
नूतन वाचनालयाच्या लोकार्पणामुळे विद्यार्थ्यांना अवांतर वाचन, स्पर्धा परीक्षा, सामान्य ज्ञान, साहित्य, विज्ञान तसेच विविध विषयांचे ज्ञान मिळविण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. वाचनाची आवड निर्माण करून विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला आणि विचारशक्तीला चालना देण्याच्या दृष्टीने हे वाचनालय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

कार्यक्रमाला जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ, तहसीलदार पवनी सतीश साळवे, गटविकास अधिकारी पवनी नितेश माने, सरपंच ममता गिरडकर, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती दुर्योधन बोरकर, मुख्याध्यापक हरिदास घावले, पोलीस पाटील मोरेश्वर भुरे, उपसरपंच देवानंद बोरकर, विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष रमेश वैद्य, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष धनराज वैद्य, शिक्षणतज्ञ तथा लोकवर्गणी संकल्पना व कार्यसमन्वयक दिगंबर कुंडलिक वंजारी, शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा शिल्पा वैद्य, तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवून सहकार्य केल्यामुळेच शाळेतील आश्चर्यकारक वाटणारे बदल शक्य झाले. जिल्हाधिकारी साहेब अगदी छोट्याशा असलेल्या आमच्या गावातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, सोमनाळा बूज येथे आले, ही लोकवर्गणीतून शाळेत केलेल्या कामांची पावती आहे.





  Print






Related Photos