बाल अस्थिरोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर यशस्वी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली महाराष्ट्र शासन, सार्वजनिक आरोग्य विभाग, राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत RBSK (राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम)–DEIC (जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र), जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली तसेच मा. दंतेश्वरी रुग्णालय, SEARCH, शोधग्राम, चातगाव आणि जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने बाल अस्थिरोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे (Pediatric Orthopedic Screening & Surgery Camp) आयोजन करण्यात आले.
दिनांक ७ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र (DEIC), जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे आयोजित करण्यात आलेल्या तपासणी शिबिरामध्ये एकूण ६२ बालकांची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या बालकांची निवड करण्यात आली. त्यानंतर पात्र बालकांकरिता दिनांक १६ व १७ ऑगस्ट २०२६ रोजी सर्च (SEARCH) हॉस्पिटल, चातगाव, गडचिरोली येथे शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये शस्त्रक्रियेसाठी निवड झालेल्या २१ बालकांपैकी १७ बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. उर्वरित बालकांसाठी आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन व पुढील उपचारांचे नियोजन करण्यात आले.
या शिबिरासाठी डॉ. आदित्य अग्रवाल (M.S.), बाल अस्थिरोग तज्ज्ञ (Pediatric Orthopedician), SEARCH हॉस्पिटल तसेच डॉ. चासनल राठोड (M.S.), बाल अस्थिरोग शल्यचिकित्सक (Pediatric Orthopedic Surgeon), मुंबई आणि त्यांच्या टीमने तज्ज्ञ सेवा दिली.शिबिरामध्ये पाय वाकडे असणे (Club Foot), गुडघे एकमेकांना लागणे, चालताना अडचण येणे, शस्त्रक्रिये नंतर व्यवस्थित पाय न जुळणे, Cerebral Palsy (CP), Down Syndrome, विविध प्रकारचे अस्थिव्यंग (Orthopaedic Deformities), Developmental Delay तसेच Delayed Milestones यांसारख्या समस्या असलेल्या ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांची तपासणी व आवश्यकतेनुसार उपचार करण्यात आले.
कार्यक्रमांतर्गत बालकांमधील जन्मजात दोष, आजार, कमतरता आणि विकासातील विलंब यांचे लवकर निदान करून त्यांना वेळेवर तज्ज्ञ उपचार उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. अशा शिबिरांमुळे ग्रामीण व दुर्गम भागातील बालकांना तज्ज्ञ वैद्यकीय सेवा त्यांच्या जवळ उपलब्ध होत असून, वेळेवर उपचारामुळे त्यांच्या शारीरिक विकासास आणि जीवनमानास मोठी मदत होत आहे.




Petrol Price




