महत्वाच्या बातम्या

 बनावट नंबर प्लेट लावून रेती तस्करी : तळोधी पोलिसांनी दोन ट्रक पकडले, ५६ लाखांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : एकाच क्रमांकाच्या बनावट नंबर प्लेटचा वापर करून अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टोळीचा तळोधी पोलिसांनी पर्दाफाश केला. तळोधी ते बाळापूर मुख्य मार्गावर २७ नोव्हेंबर रोजी केलेल्या नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी रेतीने भरलेले दोन १६ चाकी ट्रक पकडले. दोन्ही ट्रकवर एकाच क्रमांकाची नंबर प्लेट आढळल्याने हा प्रकार उघडकीस आला. या कारवाईत दोन ट्रक आणि २० ब्रास रेती असा एकूण ५६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तळोधी पोलीस २७ नोव्हेंबर रोजी तळोधी-बाळापूर मुख्य मार्गावर नाकाबंदी करीत असताना रेतीने भरलेले दोन १६ चाकी ट्रक एकापाठोपाठ येताना दिसले. पोलिसांनी पंचांसमक्ष दोन्ही वाहनांची तपासणी केली असता, दोन्ही ट्रकवर MH-१७-CV-९९७७ हा एकच नोंदणी क्रमांक असल्याचे आढळले. त्यामुळे पोलिसांना संशय आला. त्यानंतर वाहनांची कागदपत्रे, चेसिस आणि इंजिन क्रमांकांची पडताळणी करण्यात आली.

पहिल्या ट्रकचा चेसिस आणि इंजिन क्रमांक कागदपत्रांशी जुळला. मात्र, दुसऱ्या ट्रकच्या चेसिस व इंजिन क्रमांकात तफावत आढळून आली. वाहतूक अंमलदारांनी ई-चलान मशीनद्वारे तपासणी केली असता, दुसऱ्या ट्रकचा मूळ नोंदणी क्रमांक MH-४९-AT-९९८७ असल्याचे स्पष्ट झाले. एका ट्रकचा वाहतूक परवाना वापरून दुसऱ्या ट्रकवरही त्याच क्रमांकाची बनावट नंबर प्लेट लावण्यात आल्याचे तपासात उघड झाले.

आरोपींनी संगनमत करून बनावट नंबर प्लेटच्या आधारे गौण खनिजाची चोरी आणि अवैध वाहतूक केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी ३० लाख रुपये किमतीचा एक १६ चाकी ट्रक, २५ लाख रुपये किमतीचा दुसरा ट्रक आणि दोन्ही वाहनांतील प्रत्येकी १० ब्रास याप्रमाणे एकूण २० ब्रास रेती जप्त केली. रेतीची किंमत एक लाख रुपये असून, जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ५६ लाख रुपये आहे.

या प्रकरणी तळोधी पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ३१४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८, ३१९, ३३६, ३४०, ३०३(२) आणि ३(५) नुसार सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तळोधी पोलीस करीत आहेत.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि ब्रह्मपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी साहिल झरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल गुहे यांच्या नेतृत्वात पोलीस हवालदार हंसराज सिडाम, स्वप्नील चांदेकर, सचिन साखरकर, विजय वाकडे, पोलीस अंमलदार संदेश देवगडे, अक्षय हटवार तसेच चालक पोलीस हवालदार शामलाल कोडापे व चंद्रशेखर आसुटकर यांनी केले.





  Print






Related Photos