महत्वाच्या बातम्या

 त्या नरभक्षक वाघांना तत्काळ ठार करण्याचे निर्देश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना द्या


- आमदार कृष्णा गजबे यांची राज्याच्या वनमंत्र्यांकडे मागणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / देसाईगंज : जिल्ह्यातील वडसा व गडचिरोली वन परिक्षेञा अंतर्गत काहीच दिवसाच्या अंतरात वाघाच्या हल्ल्यात नागरीक ठार होण्याच्या घटनेत दिवसेंदिवस अधिकाधिक वाढ होत असल्याने व वन विभागाच्या वतीने नरभक्षक वाघांना जेरबंद करण्यासाठी यथायोग्य प्रयत्न केले जात असताना लावलेल्या सापळ्यात सदर वाघ अडकत नसल्याने अनेकांचा बळी जाण्याची शक्यता लक्षात घेता त्या नरभक्षक वाघांना तत्काळ ठार करण्याचे निर्देश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्याची मागणी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी राज्याचे वनमंत्री ना. सुधिर मुनगंटीवार यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे.राज्यात गडचिरोली जिल्ह्यातील सर्वाधिक परिसर जंगलव्याप्त असुन शेतजमिनी लागुन असल्याने येथील शेतकरी पाऊस पाणी, रोगराईच्या निर्मुलनासाठी शेतावर गेले असता वाघाच्या हल्ल्यात ठार होत असल्याच्या घटना सातत्याने समोर येऊ लागल्या आहेत. मागील दोन वर्षापासून या घटनांत सातत्याने वाढ होत असुन हल्ला करून ठार करण्यात अग्रेसर असलेल्या सीटी-१ या वाघासह स्थलांतरीत झालेले टी- १ व टी-६ या वाघांच्या हल्ल्यात देखील नागरीक ठार होत असल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत.

उपरोक्त तिनही वाघ नरभक्षक असल्याचे यामुळे स्पष्ट झाले असुन सदर वाघांनी २०२० पासून आतापर्यंत तब्बल ३५ च्या वर निष्पाप नागरिकांवर हल्ला करून ठार केले आहे. यामुळे संबंधितांच्या कुटुंबियांची अपरिमित हानी झाली असुन यात प्रामुख्याने शेतकरी, शेतमजुर व गुराखी यांचा समावेश असुन अनेकांची छत्रछायाच हिरावल्या गेली असल्याने अनेक निष्पाप बालके अनाथ झाली आहेत. सक्रिय असलेल्या वाघांना जेरबंद करण्यासाठी वन विभागाच्या वतीने कसोशीने प्रयत्न करण्यात येत असले व त्या अनुषंगाने प्रभावी उपाययोजना करण्यात येत असल्या तरी सदर वाघ लावलेल्या जाळ्यात अडकत नसल्याने सदर वाघ जेरबंद करण्याचा वन विभागा समोर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

वन विभागाच्या वतीने सक्रिय नरभक्षक वाघांना जेरबंद करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत असले तरी सदर वाघ लावलेल्या जाळ्यात अडकत नसल्याने परिसरातील नागरिकांत गैरसमज पसरला असुन सातत्याने वाघाच्या हल्ल्यात ठार होत असल्याच्या घटनांत दर दिवशी निष्पाप नागरिकाचा बळी जात असल्याने वनाधिकाऱ्यांवर निष्क्रीयतेचा ठपका ठेऊन स्थानिक नागरीक आक्रमक झाले असुन यामुळे वन विभागाचे कर्मचारी व स्थानिक नागरीक यात संघर्ष होण्याची संभाव्य शक्यता निर्माण झाली आहे.दरम्यान मागील दोन वर्षापासून सातत्याने सक्रिय नरभक्षक वाघाच्या मागावर असलेल्या सीटी- १. टी- १ व टी- ६ या वाघांनी गडचिरोली जिल्ह्यासह लगतच्या भंडारा जिल्ह्याच्या लाखांदुर तालुक्यातीलही अनेक नागरीकांचा बळी घेतल्याचे धक्कादायक वास्तव आहे. यामुळे जनतेत स्थानिक लोकप्रतिनिधींच्या कार्यप्रणालीवरही प्रश्न चिन्ह लावल्या जाऊ लागले असुन जनतेत आक्रोश आहे. ही गंभीर बाब लक्षात घेता व नरभक्षी ठरलेल्या सदर तिन्ही वाघांच्या हल्ल्यात आणखी अनेक निष्पाप जीवांचा बळी जाण्याची दाट शक्यता लक्षात घेता सदर वाघांना ठार करण्याशिवाय वन विभागा समोर पर्याय उरला नसल्याने उपरोक्त वाघांना तत्काळ ठार मारण्याचे निर्देश देण्याची मागणी आमदार गजबे यांनी राज्याचे वनमंत्री ना. सुधिर मुनगंटीवार यांची मंत्रालयात प्रत्यक्ष भेट घेऊन केली. त्याप्रसंगी वन विभागाचे प्रधान सचिव वेनुगोपाल रेड्डी उपस्थित होते.  त्यामुळे मंत्री महोदयांनी प्रधान सचिवांना घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरित वाघांना जेरबंद करण्याचे निर्देश दिले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos