महत्वाच्या बातम्या

 कान्पा जंगलात अवैध हातभट्टीवर पोलिसांची धाड; ५६ हजारांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील कान्पा जंगल परिसरात अवैधरित्या हातभट्टीची मोहा दारू गाळण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नागभीड पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संयुक्त पथकाने धाड टाकून हातभट्टीवर सुरू असलेला अवैध दारू निर्मितीचा व्यवसाय उद्ध्वस्त केला. या कारवाईत ५६ हजार ३७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, घटनास्थळावरून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले.

या प्रकरणी राकेश अरुण करिये ३८ वर्षे व रोहित प्रकाश अलोने २८ वर्षे दोन्ही रा. कान्पा, ता. नागभीड, जि. चंद्रपूर  यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ब), (क), (ड) व (फ) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कान्पा येथील जंगल परिसरात तलावाच्या बाजूला ही कारवाई करण्यात आली. घटनास्थळी आरोपी दगडांची चूल तयार करून त्यावर लोखंडी ड्रम ठेवून मोहफुलांचा सडवा शिजवत होता. जर्मनच्या घमेल्याच्या साहाय्याने आणि प्लास्टिकच्या नळ्यांमधून तो हातभट्टीची मोहा दारू गाळत असल्याचे आढळून आले. परिसरात मोहफुलांचा सडवा आणि दारू गाळण्यासाठी लागणारे साहित्यही मोठ्या प्रमाणात आढळले.

या कारवाईत २१ प्लास्टिकच्या चुंगड्यांमधील १ हजार ५० किलो आणि लोखंडी ड्रममधील २५ किलो असा एकूण १ हजार ७५ किलो मोहफुलांचा सडवा, ७५ लिटर हातभट्टीची मोहा दारू, लोखंडी ड्रम, प्लास्टिक कॅन, जर्मनचे घमेले, स्टीलचे साहित्य आणि दारू गाळण्यासाठी वापरण्यात येणारे इतर साहित्य असा एकूण ५६ हजार ३७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दारू व मोहफुलांचा सडवा नाशवंत घटनास्थळीच नष्ट करण्यात आला.

सदर कारवाई नागभिड पोलीस ठाण्याचे ठाणेदार रमाकांत कोकाटे यांचा नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक अजिंक्य गोविंदलवार, पोलीस हवालदार दिलीप ईश्वर चौधरी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस उपनिरीक्षक इंगळे यांच्या पथकाने केली. प्रकरणाचा पुढील तपास नागभीड पोलीस करीत आहेत.





  Print






Related Photos