बल्लारपूरात अग्निवीर भरतीचा रणशिंग : प्रशासन सज्ज


- अपर जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांचा आढावा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा या तीन राज्यांतील उमेदवारांसाठी अग्निवीर सैन्य भरती रॅलीचे आयोजन बल्लारपूर येथील तालुका क्रीडा संकुलात २ ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत करण्यात आले आहे. या भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व विभागांच्या समन्वयातून सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी दिल्या.
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात सैन्य भरतीच्या तयारीसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी डॉ. व्यवहारे यांनी संबंधित विभागांना विविध जबाबदाऱ्या सोपविल्या. महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम, विद्युत, पोलीस आणि राज्य परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी क्रीडा संकुल परिसराची संयुक्त पाहणी करून आवश्यक कामांचे नियोजन करावे. सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्ती व विद्युतीकरणाची कामे वेळेत पूर्ण करावीत. या कामांमध्ये कोणतीही हयगय होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले.
जिल्हा परिषदेने उमेद आणि माविमच्या बचत गटांच्या माध्यमातून स्टेडियमबाहेरील जागेत सशुल्क खाद्यपदार्थ व अन्य आवश्यक वस्तूंचे स्टॉल उपलब्ध करून द्यावेत. पोलीस विभागाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच उमेदवारांच्या गर्दीचे योग्य नियोजन करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. महानगरपालिका व नगर परिषदेकडून क्रीडा संकुल परिसरातील गवत व झुडपे हटवून स्वच्छता राखावी तसेच पुरेशा स्वच्छतागृहांची व्यवस्था करावी. परिवहन विभागाने उमेदवारांच्या ने-आणीसाठी बसेसची व्यवस्था करावी. विद्युत विभागाने भरतीच्या कालावधीत अखंड वीजपुरवठा राहील, याची दक्षता घ्यावी.
आरोग्य विभागाने रुग्णवाहिका, प्रथमोपचार साहित्य आणि डॉक्टरांचे पथक तैनात ठेवावे. उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी शिक्षण विभागाने किमान दहा शिक्षकांची नियुक्ती करावी. वन विभागाने साप व इतर वन्यप्राण्यांपासून उमेदवारांना कोणतीही हानी होऊ नये, यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध ठेवावे, अशा सूचना डॉ. व्यवहारे यांनी दिल्या. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी शुभम दांडेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बंडू रामटेके, बल्लारपूरचे उपविभागीय अधिकारी डॉ. अर्जुन पावरा, तहसीलदार रेणुका कोकाटे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.




Petrol Price




