गडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालयातील महालॅब सुरू होते दहा वाजता, वैद्यकीय अधिकारीही येतात उशिरा


- रूग्णांशीही केली जाते अरेरावी
- रूग्णांना पहावी लागते तासन् तास वाट
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
संपूर्ण  जिल्ह्याच्या आरोग्य  सेवेचा भार असलेल्या व नजीकच्या चंद्रपूर, गोंदिया, भंडारा जिल्ह्यासह छत्तीसगड राज्यातीलही रूग्ण दाखल होत असलेल्या जिल्हा सामान्य रूग्णालयात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या लेटलतीफीचा फटका रूग्णांना सहन करावा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. रूग्णालयातील महालॅब तब्बल १० वाजता सुरू होत असून रूग्णांना तासन् तास वाट पहावी लागत आहे. यामुळे रूग्णांना त्रास सहन करावा लागत आहे.
जिल्हा सामान्य रूग्णालयात नव्याने सुरू करण्यात आलेल्या महालॅबमध्ये रक्त तपासणीकरीता पाठविले जाते. ही लॅब सुरू होण्याची वेळ सकाळी ८.३० वाजताची आहे. मात्र ही लॅब कधी १०  वाजता तर कधी पावणेदहा वाजता सुरू करण्यातयेते. यामुळे रूग्णांना रांगेत उभे राहून कर्मचारी येण्याची वाट पहावी लागते. काल २४ आणि आज २५ सप्टेंबर रोजी रूग्णांची प्रचंड गर्दी होती. मात्र ओपीडी आणि महालॅबचे कर्मचारी वेळेवर पोहचले नाहीत. यामुळे या ठिकाणी वृध्द महिला, पुरूष, विद्यार्थी तसेच अन्य रूग्णांची गर्दी पहावयास मिळाली. तसेच उशिरा कामकाज सुरू होण्याबाबत कारण विचारल्यास अरेरावी केली जात असल्याचे निदर्शनास येत आहे. 
जिल्हा सामान्य रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, परिचारीका ओपीडी सुरू झाल्यानंतर तपासणीला आपल्या कक्षात हजर राहत नाहीत. कित्येक वेळ ताटकळत राहिल्यानंतर वैद्यकीय अधिकारी येतात. यावेळी रूग्णांची खुप गर्दी होते. यामुळे रूग्णांवरच रोष काढण्याचे प्रकार या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून केले जाते. एकंदरीत रूग्णांची हेळसांड केल्या जात असल्याचा प्रकार जिल्हा सामान्य रूग्णालयात पहावयास मिळत आहे. सध्या सर्वत्र रोगांची लागण झाली असल्यामुळे रूग्णालयात रूग्णांची गर्दी वाढत आहे. यामुळे वैद्यकीय अधिकारी तसेच इतर विभागातील कर्मचारी वेळेवर हजर होणे आवश्यक आहे. मात्र कक्षात उशिरा येणे आणि सुट्टी झाल्यानंतर वेळेवर जाणे असा प्रकार केला जात असल्यामुळे अनेक रूग्ण उपचारापासून वंचित राहत आहेत. याबाबत जिल्हा शल्य चिकीत्सक डाॅ. अनिल रूडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आपण बाहेर असल्याचे सांगून याबाबत बोलण्यास नकार दिला.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-09-25


Related Photos